लखनऊ – येथील पिडीत तरुणीवर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास अंत्यसंस्कार करताना तिच्या कुटुंबियांनाही तेथे येऊ दिले नाही. संपूर्ण गावच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने अतिशय तणावपूर्ण वातावरणात हे अंत्यसंस्कार झाले. पिडीतेच्या आई-वडिलांनाही तिचे अखेरचे दर्शन घेऊ न दिल्याने गावात अतिशय संतापाचे वातावरण आहे. आमच्या रितीरिवाजानुसार, तिचे अंत्यसंस्कार करु द्या, अशी आर्जव पिडीतेचे कुटुंबिय करीत होते. मात्र, पोलिसांनी ही मागणी धुडकावत स्वतःच अंत्यसंस्कार केले. यावेळी केवळ पोलिसच तेथे होते अन्य कुणालाही तेथे उपस्थित राहण्यास मज्जाव करण्यात आला होता.
एसआयटी स्थापन; खटला फास्ट ट्रॅक कोर्टात
लखनऊ – हाथरस बलात्कार प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई कारवाईचे आदेश दिले आहेत. संबंधित खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जाईल अशी माहिती त्यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
उत्तर प्रदेशचे गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली हाथरस येथे दलित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि त्यानंतरच्या उपचारादरम्यान मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) ची स्थापना केली आहे. त्याचा तपास आता फास्ट ट्रॅक कोर्टात होणार आहे. येत्या सात दिवसांत एसआयटी संबंधित अहवाल सादर करणार आहे. हाथरस घटनेत दोषी असलेल्या व्यक्तींवर न्यायालयात खटला चालविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने केलेल्या ट्विटनुसार, ‘हाथरसच्या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापना केली आहे, त्यात अध्यक्ष म्हणून गृहसचिव भगवान असणार आहेत. तसेच पोलिस उपनिरीक्षक चंद्रप्रकाश काम पाहणार आहेत. पीडित मुलीवर काल रात्री पोलीस दलात अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक विक्रांत वीर यांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.