हाथरस, लखनऊ – येथील तरुणीवर सामुहिक अत्याचार झाल्याप्रकरणी गुरुवारी धक्कादायक बाब समोर आली. तरुणीवर बलात्कारच झाला नसल्याचे फॉरेन्सिक तपासात दिसत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाची अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाने स्वतःहून गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. डीजीपी, एडीजी (कायदा व सुव्यवस्था), हाथरसचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक या सर्वांना कोर्टाने समन्स बजावले आहे. याप्रकरणी १२ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यावेळी या सर्वांना कोर्टासमोर माहिती सादर करावी लागणार आहे.
बलरामपूरमध्येही अत्याचाराची घटना
उत्तर प्रदेशात हाथरस पाठोपाठ बलरामपूर येथेही एका युवतीवर अत्याचार झाल्याची बाब समोर आली आहे. कॉलेजमध्ये गेलेल्या एका युवतीला ३ ते ४ जणांनी बळजबरी कारमध्ये बसविले. तिला गुंगीचे इंजेक्शन देऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिला रिक्षात बसवून दिले. हॉस्पिटलमध्ये जात असतानाच तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या युवतीचेही अंत्यसंस्कार पोलिसांनी रात्री ११ वाजेच्या सुमारास केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांबाबत तीव्र संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे.