हाथरस (उत्तर प्रदेश) – येथील सामुहिक बलात्कार प्रकरणी पिडीत युवतीच्या कुटुंबियांनी ५ प्रश्न उत्तर प्रदेश सरकारला विचारले असल्याची माहिती काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केले असून हे सर्व प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
प्रियंका यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, पिडीत कुटुंबाचे ५ प्रश्न आहेत.
१ सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी
२ हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे आणि त्यांना कुठलेही मोठे पद देऊ नये
३ आम्हाला न विचारता आमच्या मुलीच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून का अंत्यसंस्कार करण्यात आले?
४ आम्हाला वारंवार संभ्रमित केले आणि धमक्या का दिल्या जात आहेत?
५ आम्ही हे कसे मानू शकतो की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता?
या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याचा त्या परिवाराला हक्क असल्याचे प्रियंका यांनी म्हटले आहे. पिडीत कुटुंबाच्या म्हणण्यानुसार सर्वात वाईट वागणूक ही जिल्हाधिकाऱ्यांकडूनच मिळाली आहे. त्यांना कोण वाचवत आहे. त्यांच्या संपूर्ण निर्णय आणि वागणुकीची चौकशी व्हायला हवी. न्यायालयीन चौकशीची मागणी असताना सीबीआय किंवा एसआयटीद्वारे का चौकशी केली जात आहे, असा सवाल प्रियंका यांनीही विचारला आहे. उत्तर प्रदेश सरकार जर झोपेतून जागी झाली असेल तर त्यांनी पिडीत कुटुंबाचे म्हणणे ऐकायला हवे, असा टोलाही प्रियंका यांनी लगावला आहे.