नवी दिल्ली – लिंग आणि जातीय विषमता अजूनही समाजात भरली आहे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हाथरसची सामूहिक बलात्काराची घटना. त्यावर समाजाचे दोन भाग होणे आणि सरकारनेही त्या घटनेतील उच्चवर्णीय आरोपींची बाजू घेऊन कारवाईत केलेला विलंब निषेधार्ह आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि राष्ट्रीय समन्वयक मेधा पाटकर यांनी केले. उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील भूलगर्ही येथे अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबियांची त्यांनी नुकतीच भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या.
उत्तर प्रदेशाच्या हाथरस जिल्ह्यातील भूलगर्ही येथे पीडित कुटुंबाच्या गावाला पोलीस छावणीचे रूप आले आहे. त्या सर्व बंदोबस्तामधून कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन घडलेली घटना, त्यानंतर समाजातील आरोपी आणि जातीयवादी, दहशतवादी, सरकारकडून कुटुंबावर येत असलेला दबाव या कार्यकर्त्यांनी समजावून घेतला. अद्याप मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट कुटुंबाला मिळालेला नाही. तिला उपचारासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या दवाखान्यात न नेता सफदरजंग हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. पोलिसांनी कुटुंबाच्या ताब्यात मुलीचे प्रेत न देता ते रात्रीतून अग्निसंस्कार केले असे प्रश्न त्यांनी स्थानिक सरकारला विचारले आहेत. या घटनेचा समाजात सर्व स्तरावर निषेध होत असून कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी मेधा पाटकर, एनएपीएम आणि सोशालिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे डॉ. संदीप पांडे, एनएपीएम आणि खुदाई खिदमतगारचे फैसल खान, गांधी स्मृती आणि दर्शन समितीच्या माजी अध्यक्षा डॉ. मणिमाला, सर्वोच्च न्यायालयातील वकील अँड. हाशमी, दिल्ली सॉलिडॅरिटी ग्रुपचे अमित कुमार यावेळी उपस्थित होते.
—
‘हम तो बोलेंगे’ अभियानाला सुरुवात
देशभर या घटनेने समाज ढवळून निघाला आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि त्यात जातीचा घेतला जाणारा गैरफायदा याविरुद्ध देशभर चळवळ अधिक सक्रिय करण्याची घोषणा मेधा पाटकर यांनी केली. २७ सप्टेंबर पासून एनएपीएमच्या वतीने देशभर ‘हम तो बोलेंगे’ हे अभियान सुरु झाले आहे. जागतिक मानवी हक्क दिन (१० डिसेंबर) पर्यंत चालणाऱ्या या अभियानात देशभर ‘लिंग आणि जातीय विषमता’ याविरुद्ध जनजागृती केली जाईल आणि ‘हम तो बोलेंगे’चा नारा अधिक बुलंद करण्यात येईल. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मेधा पाटकर यांनी या भेटीच्या निमित्ताने केले आहे.