नाशिक – शहरात कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील रस्त्यांवर विविध वस्तू आणि पदार्थ विक्री करणारे हातगाडीवाले आणि व्यावसायिक हे कोरोनाचा मोठा प्रमाणात फैलाव करणारे असू शकतात. ही शक्यता गृहित धरुन महापालिकेने या सर्व विक्रेते आणि व्यावसायिकांची आरटीपीसीआर ही चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने तब्बल ३० पथकांची नियुक्तीही केली आहे.
नाशिक शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तो प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने विविध पातळ्यांवर मनपा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. शहरात विविध किराणा दुकानदार, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, औषध विक्रेते, हातगाडीवरील विक्रेते, सलून चालक, आदींचा विविध लोकांशी संपर्क येतो. त्यांच्या संपर्कामुळे देखील कोविड -१९ कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व विक्रेत्यांची कोविड-१९ आर.टी.पी.सी.आर चाचणी करून घेण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे.
त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आरोग्य विभागाला निर्देश दिल्यानंतर विभागाने ३० पथकांची नेमणूक केली. नागरिकांनी आलेल्या आरोग्य पथकास सहकार्य करून स्वतःची कोविड-१९ आर.टी.पी.सी.आर चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.
कर्मचाऱ्यांचीही चाचणी
नाशिक महानगरपालिकेचे सर्व कार्यालये, विभागीय कार्यालये तसेच रुग्णालय इत्यादी ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी, शहरातील सर्व सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक इत्यादींचा सतत बाहेरील नागरिकांशी संपर्क येत असतो. तरी हे अधिकारी व कर्मचारी हे कोविड-१९ कोरोना बाधित झाल्यास ते सुपर स्प्रेडर (super spreaders) होऊ शकतात. त्यांच्या संपर्कामुळे देखील कोविड-१९ कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यालयात कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचीही कोविड-१९ आर.टी.पी.सी.आर चाचणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार या चाचण्या घेण्यासाठीही पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या तपासण्या सुरू करण्यात आलेल्या असल्याची माहिती आरोग्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागरगोजे यांनी दिली आहे.