देवळा – अतिवृष्टीमुळे डाळींबावर विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लाखो रुपयांचा खर्च करुनही हाती काहीच मिळत नसल्याने वैतागलेल्या वासोळ येथील शेतकऱ्याने थेट डाळींब बागेवरच कुऱ्हाड चालविली आहे.
वासोळ येथील शेतकरी नारायण गिरासे यांच्या तीन एकर डाळींब बागेचे मोठे नुकसान झाले आहे. डाळींब लागलेले असतानाच त्यात किडीचा प्रादुर्भाव झाल्याने अखेर त्यांनी स्वतःच्या हाताने बागेवर कुऱ्हाड चालवली आहे.
गेल्या १५ दिवसांपूर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये डाळींब, बोर या फळ बागांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या बागा नष्ट झाल्या आहेत. अतिवृष्टीनंतर मर, तेल्या, प्लेग या सारख्या विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दुहेरी संकटामुळे डाळींब शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.
नारायण गिरासे यांनी अत्यंत कष्टाने जोपासलेल्या तीन एकर बागेसाठी औषधे, खते, मजुरीसाठी बॅंकेचे कर्ज काढून दोन लाख रुपयांचा खर्च करुन बाग फळासाठी तयार केली होती. अशातच अतिवृष्टी झाली आणि गिरासे यांच्या बागेचे होत्याचे नव्हते झाले. सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे गिरासे यांनी सांगितले आहे. अद्याप विमा कंपनीची मदत मिळाली नाही की शासनाने मदतीसाठी हात पुढे केला नाही. विमा कंपनीने नुकसानभऱपाई द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. अन्य शेतकऱ्यांचीही स्थिती अशीच असून सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.