ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील (एचएएल) कर्मचारी हेरगिरी प्रकरणात सापडल्यानंतर नाशिकमधील संरक्षण संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात प्रकाश टाकणारी ही वृत्तमालिका….
इंडिया दर्पण विशेष वृत्तमालिका – सुरक्षेचे तीनतेरा – भाग ६
हवाई दलाचा ‘त्या’ प्रकारास तीव्र विरोध; सर्वांचेच दुर्लक्ष
भावेश ब्राह्मणकर, नाशिक
ओझर येथे एचएएलच्या आवारालगतच हवाई दलाचे केंद्र आहे. या केंद्राने एका मोठ्या प्रकारास सुरक्षेच्या कारणास्तव तीव्र विरोध केला. जिल्हाधिकाऱ्यांपासून थेट मंत्रालयापर्यंतही पाठपुरावा केला पण स्थानिक राजकारणामुळे त्याचे पुढे काहीही होऊ शकलेले नाही. गोपनीय आणि देश सुरक्षेच्या संदर्भातील तो पत्र व्यवहार अद्यापही गांभिर्याने घेतलेला नाही. त्यामुळे हेरगिरीचे प्रकारांना लगाम बसणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ओझर हवाई दल केंद्र हे हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे मुख्य केंद्र आहे. नागपूर येथे मुख्यालय असलेल्या हवाई दलाच्या मेन्टेनन्स कमांड अंतर्गत हे केंद्र काम करते. या केंद्रात मिग आणि सुखोई या विमानांची देखभाल व दुरुस्ती केली जाते. गेल्या काही वर्षांपासून तर या केंद्राने दुरुस्ती बरोबरच विमानांचे अपग्रेडेशनही सुरू केले आहे. त्यामुळेच जुनी विमाने सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होत आहेत. या केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ एसटी महामंडळाचे बसस्थानक साकारले जात आहे. यास हवाई दल केंद्राने तीव्र विरोध दर्शविला. या स्थानकाच्या ठिकाणी कुणीही, केव्हाही आणि कितीही वेळ थांबेल, हेरगिरी करेल असा हवाई दलाचा आक्षेप होता व आहे. कारण, या प्रवेशद्वारातून कोण जाते, केव्हा जाते, कुठे जाते यासह विविध बाबींवर कुणीही पाळत ठेऊ शकते. बसस्थानक हे सार्वजनिक ठिकाण असल्याने तेथे कुणावरही निर्बंध लादता येणार नाहीत. यामुळे हेरगिरी करणाऱ्यांना हे हक्काचे ठिकाण मिळेल, असे हवाई दल अधिकाऱ्यांचे मत आहे. यासंदर्भात हवाई दल केंद्राच्या प्रमुखांनी स्थानिक पोलिस, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ आदींना पत्र दिले. प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे ही बाब कथन केली. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या सर्व बाबीकडे विचार व्हायला हवा, असेही सांगितले. तरीही त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट मंत्रालय आणि मुख्य सचिवांपर्यंत ही बाब नेली. मात्र, तेथेही त्याचे गांभिर्य ओळखले गेले नाही. स्थानिक राजकारण आणि राजकीय नेत्यांच्या आग्रहामुळे हे बसस्थानक अखेर साकारण्यात आले आहे. एचएएलमध्ये नुकत्याच घडलेल्या हेरगिरीच्या प्रकरणामुळे हा प्रकारही समोर आला आहे.
स्थानिक नागरिकांची सोय आणि राजकीय नेत्यांचा हट्ट हे पाहता अखेर हवाई दल अधिकाऱ्यांनी बसस्थानकास विरोध करणे सोडून दिले. मात्र, याठिकाणी सुरक्षेच्या योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणीलाही केराची टोपली दाखविण्यात आली आहे. बसस्थानकावर अत्याधुनिक अशा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात यावी. जेणेकरुन संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर लगेच कारवाई होऊ शकेल, असे हवाई दल अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हे बसस्थानक बांधून पूर्ण झाले असले तरी सीसीटीव्हीच्या प्रस्तावावर काहीच झालेले नाही. निधीच्या प्रश्नावरुन हे घोडे अडल्याचेही सांगितले जात आहे. देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या महत्त्वाच्या केंद्रांच्या सुरक्षेसंदर्भात प्रशासकीय पातळीवर किती गांभिर्य असते हेच यानिमित्ताने समोर येत आहे. या सर्व प्रकाराबाबत हवाई दलाकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मात्र, त्याचे सोयर सूतक कुणालाही नसून देशविघातक कारवाई किंवा घटना घडल्यानंतरच आपण जागे होणार का, असा प्रश्न संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून विचारला जात आहे.
(क्रमशः)