मुंबई – अभिनेता अरबाज खान, सोहेल खान आणि सोहेलचा मुलगा निर्वाण खान यांना हलगर्जी भोवली आहे. मुंबई महापालिकेने या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संयुक्त अरब इमिराती (युएई) वरुन हे तिघे मुंबई विमानतळावर आले. त्यानंतर या तिघांना हॉटेल ताजमध्ये सात दिवस विलगीकरणात राहण्याचे सांगण्यात आले. मात्र, हे तिघेही थेट घरी निघून गेले. कोरोना नियमांचे उल्लंघन करणे या तिघांना आता महागात पडले आहे. खार पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते चैतन्य एस यांनी सांगितले आहे. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेले नाही.