नाशिक – ट्रेकिंग व पर्यटनासाठी आकर्षणाचा मोठा केंद्रबिंदू असलेल्या हरिहर गडावर येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. वीकेंडला तर याठिकाणी शेकडोने ट्रेकर्स आणि पर्यटक येत असल्याचे दिसून येत आहे. या गडावर चढण्यासाठी जो मार्ग आहे त्यावर एकावेळी केवळ ५० ते ६० जण ये-जा करु शकतात. मात्र, प्रचंड गर्दीमुळे याठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो, असा इशारा दुर्गप्रेमींनी दिला आहे.
गडावर येणाऱ्यांमध्ये हवश्या नवश्यांची मोठी संख्या असते. सुरक्षेची पुरेशी साधनेही अनेकांकडून बाळगली जात नाहीत. दिवाळीच्या सुट्यांमध्ये येथे प्रचंड गर्दी होण्याची भीती आहे. विशेष म्हणजे, या गर्दीवेळी येथे आपत्कालीन कुठलीही सुविधा नाही. त्यामुळे अपघात झालाच तर रेस्क्यू पथकाला आमंत्रित करणे आणि त्यांची प्रत्यक्षात मदत होणे यात मोठा कालावधी जाणार आहे. यादरम्यान, मोठी जिवीतहानी होऊ शकतो, अशी भीती दुर्ग प्रेमी राहूल सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासन, वनविभाग आणि ग्रामीण पोलिस यांनी ठोस निर्णय घेण्याची मागणी होत आहे. शनिवारी व रविवारी येथे येणाऱ्यांसाठी वनविभागाने प्रवेश शुल्क आकारावे, त्यासाठी प्री बुकींग घ्यावे. क्षषता संपली की बुकींग बंद करावे, अशी सूचना ट्रेकर संजय अमृतकर यांनी केली आहे.









