सटाणा – हरणबारी व केळझर धरणातून पुरपाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर आरम व मोसम नदीपात्रात सुरु आहे. सदरचे पूरपाणी हे कालव्याद्वारे सोडले तर शेतशिवारातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. त्याचा बागायत शेतीला फायदा होणार आहे. त्यामुळे सदरचे पूरपाणी हे कालव्याद्वारे सोडण्याची मागणी माजी आमदार दिपिका चव्हाण यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
चव्हाण यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सद्यस्थितीत केळझर मधून १९८ तर हरणबारी धरणातुन ५२३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग आरम व मोसम नदीपात्रात सुरु आहे. यातील काही पाणी हे केळझर डाव्या कालव्याद्वारे तर हरणबारी धरणाचे पूरपाणी हे हरणबारी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सोडले तर पाण्याच्या पातळीचा समतोल राखता येईल. बागायत क्षेत्राला याचा उन्हाळ्यात फायदा होईल. अशा पद्धतीने नियोजन पाटबंधारे विभागाने करावे, असे पत्रात म्हटले आहे.
हरणबारीचे पाणी तळवाडे, भामेर पोहोच कालव्यापर्यंत सोडण्यात यावे. तर केळझरचे पुरपाणी चारी क्र ८ द्वारे हे पूरपाणी सोडण्यात येऊन पाटस्थळवर असलेले बंधारे भरण्यात यावेत. जेणेकरुन उन्हाळ्यात बागायत क्षेत्राला पाणी टंचाई जाणवणार नाही. केळझरच्या डाव्या कालव्यावर डांगसौंदाणे, कऱ्हाळेपाड़ा, भिलदर, किकवारी, वटार, विरगाव, वनोली डोंगरेज आदी गावांच्या रब्बीचा पाणी प्रश्न सोडविता येतो. तर हरणबारी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे मोसम खोऱ्यातील असंख्य गावांचा रब्बीचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होते, असे चव्हाण यांनी सांगितले आहे.