सटाणा – बागलाण तालुक्याची तहान भागविणारे हरणबारी व केळझर हे दोन्ही मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. त्यामुळे मोसम आणि आरम नदीला पूर आला आहे. तालुक्याला वरदान ठरणाऱ्या या दोन्ही प्रकल्पांच्या जलपूजनचा मान आमदार दिलीप बोरसे यांनी शेतकरी आणि अधिकार्यांना दिला. त्यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत पूजन करण्यात आले.
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील हरणबारी व केळझर या मध्यम प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून सततधार सुरु असल्याने दोन्ही प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यामुळे आरम व मोसम या दोन्ही नद्यांना पूर आला आहे. या दोन्ही प्रकल्पांचे जलपूजन द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, नायब तहसीलदार नानासाहेब बहिरम, जलसंपदा विभागाचे उपअभियंता अभिजित रौंदळ, कंधाणे येथील प्रतिष्ठित शेतकरी बाळासाहेब बिरारी, चौंधाणे येथील माजी सरपंच राकेश मोरे, डांगसौंदाणे येथील हेमंत चंद्रात्रे, बाळासाहेब सोनवणे यांना सपत्नीक जलपूजनाचा मान देण्यात आला. याप्रसंगी आदर्शगाव किकवारीचे प्रणेते केदा काकुळते, बाजार समितीचे संचालक कृष्णा भामरे, कृषिभूषण खंडेराव शेवाळे, सटाणा बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे, अनंत दीक्षित, सुभाष बिरारी, शाखा अभियंता संजय पाटील, बापू अहिरे, मधुकर चौधरी, पंकज गायकवाड, बाळासाहेब वाघ आदी उपस्थित होते.
लवकरच मोरेंचे स्मारक
केळझर धरण परिसरात स्व. गोपाळराव मोरे यांचे स्मारक व्हावे यासाठी चौंधाणे येथील माजी सरपंच राकेश मोरे यांनी मागणी केली. तालुक्यातील ३८ खेड्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता कै. गोपाळराव मोरे यांच्या खडतर प्रवासामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास आला. म्हणून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरिता स्मारक होणे गरजेचे आहे. या मागणीला आमदार बोरसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. स्मारकसाठी शासनाकडून जागा उपलब्धते करिता पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन बोरसे यांनी दिले.