नाशिक – निवृत्तीवेतनधारकांसाठी भारतीय डाक विभागातर्फे भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून सुरू केलेल्या घरपोच जीवन प्रमाण सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन डाक विभागाचे नाशिक मंडल वरिष्ठ अधीक्षक मोहन अहिरराव यांनी शासकीय प्रसिद्दीपत्राद्वारे केले आहे.
निवृत्तीवेतनधारकांना पेन्शन सुरू रहावी म्हणून प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर ,डिसेंम्बर या महिन्यात जीवन प्रमाणपत्र संबंधित बँकांना देणे बंधनकारक असते. हे प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने निवृत्तीवेतनधारकांना उपलब्ध व्हावे यासाठी भारतीय डाक विभागाने इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून डिलिव्हरी पोस्ट ऑफिसमध्ये किंवा घरपोच जीवनप्रमाण योजना सुरू केली आहे. निवृत्तीवेतनधारकांनी जवळच्या पोस्ट ऑफिससोबत संपर्क करावा आणि पोस्टइन्फो (postinfo) नावाचे एप्लिकेशन डाउनलोड करून त्यात योग्य माहिती भरून विनंती नोंदवू शकतात. विनंतीनुसार पोस्टमन निवृत्तीवेतनधारकांची माहिती बायोमॅट्रिक प्रणालीद्वारे भरून घेणार असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
जीवन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी निवृत्तीवेतन धारकांकडे पेन्शनचा प्रकार, कोणत्या विभागाची पेन्शन, पेन्शन मिळणाऱ्या बँक किंवा पोस्ट ऑफिसचे नाव, पेन्शन पेमेंट ऑर्डर क्रमांक, पेन्शन जमा होणाऱ्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्याचा खाते क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक आणि आधार क्रमांक इ माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. या सुविधेसाठी शुल्क प्रति जीवन प्रमाण सर्व करांसहित रुपये 70/- एवढे आहे.
५००पेक्षा अधिक पोस्टात सुविधा
ही सुविधा शहरी भागासोबतच ग्रामीण भागात सुद्धा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील एकूण 500 हुन अधिक शहरी आणि ग्रामीण पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी डाक पाल, ग्राम डाक यांचेकडे संपर्क साधून सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन देखील नाशिक मंडल वरिष्ठ डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले