मनाली देवरे, नाशिक
…..
गुरूवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा ६ विकेटसने पराभव करून कोलकात्याची पंचाईत करून टाकली. अर्थात, या विजयाने केकेआर संकटात सापडली असली तरी मुंबई इंडीयन्स संघाला माञ या निकालाने पहिल्या चार संघात म्हणजेच प्ले ऑफच्या फेरीत आयताच परंतु अधिकॄत प्रवेश मिळाला आहे.
या सामन्याचा निकाल अजब असाच म्हणावा लागेल. चेन्नई विजयी झाली असली तरी या विजयानंतरही त्यांच्या अपयशात फारसा फरक पडणार नसल्याने त्यांना तितकासा आनंदा या विजयाने मिळालेला नाही. केकेआरच्या अडचणी वाढल्याने सहाजिकच केकेआरच्या चेह–यावरची चिंता दिसून येत होती. परंतु, प्रत्यक्ष जो संघ या सामन्यात खेळत नव्हता तो मुंबई इंडीयन्स संघ माञ गुणांच्या अजब गणितीय खेळामुळे पहिल्या चार मधले पोहोचल्याने या सामन्याचा थर्ड पार्टी बेनिफिशरी संघ ठरला. “हम तो डूबे है सनम, तुमको भी ले डूबेंगे” … जणू असाच काहीसा प्रकार या लढतीमध्ये घडला. २०२० च्या आयपीएलची लढाई हरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने परतीच्या प्रवासासाठी आपल्या बॅगा बांधण्यापुर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून त्यांना अडचणीत आणले. आता केकेआरचा राजस्थान रॉयल्ससोबत अवघा एक सामना शिल्लक आहे. १३ सामन्यात १२ गुण जमा झालेल्या केकेआरचा प्रवास अजूनही संपलेला नसला तरी या पराभवाने तो आणखी कठीण नक्कीच झाला आहे. राजस्थान सोबत मोठया फरकाने हा सामना जिंकल्याखेरीज कोलकात्याला पुढच्या फेरीची अपेक्षा बाळगता येणार नाही.
या सामन्यात १७२ धावांचा पाठलाग करतांना चेन्नईची कुठेही दमछाक झाली नाही हे विशेष. शेन वॉटसन बाद झाल्यानंतर या आयपीएलच्या सञात सुरूवातीला कोरोनाशी झुंज देवून यशस्वीरित्या परतलेला महाराष्ट़ाचा रणजीपटू ॠतुराज गायकवाड आणि त्याच्या सोबतीला अंबाती रायडु यांनी दुस–या विकेटसाठी एक महत्वाची भागीदारी रचली. ॠतुराज ७२ धावा करून बाद झाल्यानंतर आणि लगेचच धोनी सुध्दा पॅव्हेलियन मध्ये परतल्यानंतर चेन्नईच्या गोटात चिंता पसरली होती. परंतु सर रविंद्र जाडेजा आणि सॅम करण यांनी चेन्नईच्या स्वप्नाची पुर्तता केली. धोनीची टॉस जिंकून क्षेञरक्षण करण्याची कल्पकता या दोघांना उपयोगी पडली कारण १९ व्या षटकात फर्ग्युसनच्या हातातून ओला झालेला चेंडू अक्षरशः निसटत होता आणि या षटकात या दोघांनी २० धावा झोडपून काढल्या. चेन्नई संघात या सामन्यासाठी दोन बदल करण्यात आले होते. लुंगी एंगीडी हा उंचापुरा मध्यमगती गोलंदाज आणि सलामीचा शेन वॉटसन संघात आले होते. परंतु, या बदलाचा फारसा उपयोग चेन्न्ाईला झाला नाही.
महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून क्षेञरक्षणाचा निर्णय घेतला होता. हा फंडा यंदाच्या आयपीएलमध्ये अनेकदा फसला आहे. परंतु, दुस–या डावात हिरवळीवर दव पडत असल्याने चेंडू ओला झाल्यानंतर गोलंदाजी करणे अवघड जात असल्याने हाच निर्णय अनेक सामन्यात आपल्याला बघायला मिळाला. केकेआरने माञ फलंदाजीचे आमंञण मिळाल्यानंतर त्याचा पुरेपुर उपयोग करून घेतला. शुभमन गिल (२६ धावा) आणि नितीश राणा (८७ धावा) या दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी सुंदर फलंदाजी केली. अखेरच्या काही षटकात फलंदाजीची संधी मिळालेल्या दिनेश कार्तीकने १० चेंडून २१ धावांची छोटीशी धडाकेबाज खेळी करून चेन्नईला २० षटकात १७३ धावा करण्याचे आव्हान दिले होते.
शुक्रवारची लढत
आयपीएल २०२० सिझनची आणखी एक महत्वपुर्ण लढत शुक्रवारी खेळली जाईल. किंग्ज इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स हा सामना अबुधाबीत होणार आहे. १२ सामन्यात पंजाब संघाकडे १२ गुण आहेत तर राजस्थानकडे अवघे १० गुण. परंतु, या सिझनमध्ये अदयापही प्ले ऑफ गाठण्याची राजस्थानची संधी पुर्णपणे गेलेली नाही. उर्वरीत दोन सामन्यात मोठे पराभव करून राजस्थान प्ले ऑफ गाठू शकतो असे आकडेवारी सांगते. साखळीच्या पहिल्या सामन्यात राजस्थान संघाने पंजाबचा पराभव केला होता हे या ठिकाणी विसरून चालणार नाही. परंतु, त्याचवेळेला दोन्ही संघाने खेळलेल्या मागच्या ५ सामन्यांचा जर विचार केला तर सर्व सामने किंग्ज इलेव्हन पंजाबने जिंकले आहेत आणि राजस्थानला मागच्या ५ पैकी अवघे २ सामने जिंकता आले आहेत या आकडेवारीकडे देखील कानाडोळा करता येणार नाही.
पंजाब संघात ख्रिस गेल बरा होवून परतल्यापासून फलंदाजीत मजबुती आली आहे. के.एल.राहूल आणि मंयक अग्रवाल हे अजुनही त्यांचा फॉर्म ब–यापैकी टिकवून आहेत. याउलट, संजु सॅमसन हा राजस्थानचा सलामीचा फलंदाज या स्पर्धेतील सुरूवातीचे सातत्य फारसे टिकवू शकलेला नाही तर राहूल तेवतिया याने जो स्पार्क १–२ सामन्यात दाखविला होता तो स्पार्क आता फारसा भरवशाचा राहीलेला नाही.