बंगळुरू – भक्ती ही धर्माच्या पलीकडे असते, असं म्हणतात. याचंच एक उदाहरण बंगळुरूमध्ये दिसले. शहराच्या बाहेरच्या भागात असलेल्या या मंदिराच्या विस्तारीकरणासाठी एका मुस्लिम व्यावसायिकाने १६३४ चौ. फूट जमीन दिली आहे. या जमिनीची किंमत ८० लाख ते १ कोटी एवढी असल्याचा अंदाज आहे. व्यावसायिकाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
या व्यावसायिकाच नाव आहे एमएमजी बाशा. वालगेरापूर येथील त्यांच्या तीन एकर जमिनीला लागून एक हनुमान मंदिर आहे. या मंदिरातील भक्तांची संख्या सातत्याने वाढते आहे. या मंदिराचा विस्तार करण्याचा ट्रस्टचा विचार होता, पण आर्थिक तुटवड्यामुळे हे शक्य होत नव्हते. बाशा यांनी मंदिर ट्रस्टला सांगितले की, ते आपली जमीन देण्यास इच्छूक आहेत. पण, ही जमीन महामार्गाजवळ असल्याने तिची किंमत खूप आहे.
मंदिर ट्रस्टने विस्तारीकरणासाठी १०८९ चौ. फूट जमिनीची मागणी केली होती. पण, बाशा यांनी आपल्या परिवाराशी बोलणं करून १६३४ चौ. फूट जमीन देऊन टाकली. त्यांनी एकही पैसा न घेता ही जमीन ट्रस्टला दिली आहे. ट्रस्टने एक बॅनर लावून बाशा आणि त्यांच्या परिवाराला धन्यवाद दिले आहेत.