मालेगाव – लाचखोरीची कीड किती खोलवर रुजली आहे याचा प्रत्यय येथे आला आहे. पवारपाडी पोलिस स्टेशनमधील पोलिस नाईक चंद्रकांत हरिभाऊ कडनोर (बक्कल नंबर १२२५) याला अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) ५ हजाराची लाच घेताना अटक केली आहे. विशेष म्हणजे, कडनोर याने एका गंभीर प्रकारात लाच मागितल्याची बाब समोर आली आहे.
सप्टेंबर महिन्यात मुलगा हरविल्याची तक्रार त्याच्या पित्याने पवारवाडी पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. मुलाचा मोठा शोध घेतल्यानंतर अखेर तो सापडला. यामुळे कुटुंबियांच्या जीवात जीव आला. मात्र, पोलिस स्टेशनमधील दाखल तक्रार रद्द करायला हवी म्हणून मुलाचे वडिल पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये आले. त्याचवेळी पोलिस नाईक कडनोर याने ही तक्रार मागे घेण्यासाठी थेट पाच हजार रुपयांची मागणी केली. हरवलेला मुलगा मिळाल्याची तक्रार परत घेण्यासाठी थेट एवढ्या मोठ्या रकमेची मागणी होत असल्याने यासंदर्भात एसीबीला कळविण्यात आले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. पोलिस स्टेशनच्या जनरेटरजवळ कडनोर याने पाच हजार रुपये स्विकारले. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर कडनोर याला एसीबीच्या पथकाने अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांकडून अशा प्रकारे लाच घेतली जात असल्याच्या या प्रकारामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.