नवी दिल्ली – भोंदूबाबा काय करतील याचा काहीच नेम नाही. गेल्या वर्षी बलात्काराच्या आरोपानंतर फरारी झालेल्या भोंदू बाबा नित्यानंदने चक्क स्वतःचा देश घोषित केला आहे. कैलासा नावाच्या ‘संभू हिंदू राष्ट्र’ या देशामध्ये तो आता पर्यटकांना ३ दिवसांचा व्हिसाही देत आहे. त्यानेच व्हिडिओद्वारे तशी माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलियामार्गे जावे लागणार
रहस्यमय अशा कैलासा या देशात जाण्यासाठी प्रवासी, भाविक आणि पर्यटकांना सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाला जावे लागणार आहे. त्यानंतर खाजगी चार्टर्ड विमान गरुडच्या माध्यमातून त्यांना नित्यानंदच्या देशात नेले जाणार आहे. वास्तविक हाच भोंदूबाबा बलात्काराच्या गुन्ह्यातील चाचण्या टाळण्यासाठी भारत सोडून पळाला आहे.
ती व्यवस्था मोफत
व्हिडिओत हा भोंदूबाबा सांगतो आहे की, पर्यटकांना एकदा ‘परम शिव’ दिसणार आहे. त्याकरीता आजपासून तुम्ही कैलासाच्या व्हिसासाठी अर्ज करू शकता. सर्व पर्यटकांची राहण्याची व निवासाची व्यवस्था मोफत असेल. मात्र, ऑस्ट्रेलियात येण्याची व्यवस्था पर्यटकांना स्वतःलाच करावी लागेल.
असा आहे बाबाचा इतिहास
‘नित्यानंद ध्यानपीठम’ नावाचा धार्मिक गट स्थापन करणारा नित्यानंद हा नेहमीच वादात सापडला आहे. त्याच्यावर बलात्कार, अपहरण आणि मुलांना ओलीस ठेवणे असे गंभीर आरोप आहेत. तामिळनाडूच्या जोडप्याने आरोप केला होता की, त्यांच्या मुलांना या बाबाने पळवून अहमदाबादमधील आश्रमात ओलीस ठेवले. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच १९ वर्षीय महिलेचे अपहरण व अत्याचाराचा आरोपही त्याच्यावर आहे. नित्यानंद देश सोडून पळाल्याचे पोलिसांनी जाहिर केले. पोलिसांसह सरकारी संस्था अद्यापही त्याचा शोध घेत आहेत. आणि आता त्याचा व्हिडिओ आला की त्याने देश स्थापन करुन व्हिजा देण्यास सुरुवात केली आहे.
बघा भोंदू बाबाचा हा व्हिडिओ
https://twitter.com/VishweshwarBhat/status/1339476517651267584