आग्रा – मद्य पिणाऱ्याला दारू दुकानाचा मार्ग बरोबर सापडतो, असे म्हणतात. किंबहुना मदीरा प्यायची असेल माणूस स्वर्गातच नव्हे तर पाताळात देखील जाईल, असे गंमतीने म्हटले जाते. काही दारू विक्रेते हे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या धाकाने काहीही युक्ती करतात. आग्रा येथील एका बहाद्दराने दारूसाठी चक्क विहीरच खोदल्याचे समोर आले आहे.
हेराफेरी या हिंदीतील विनोदी चित्रपटात बाबूराव (परेश रावल) गंमतीने म्हणतात, माझी इच्छा आहे की, आपल्याकडे वाइनची विहिर पाहिजे. इकडे आग्रा येथे एका माणसाने चक्क खरोखर वाईनची विहीर खोदली. आपल्याकडे खेड्यातल्या लोकांनी पाण्यासाठी विहीर खोदल्या आणि तेथे हातपंप बसवले जातात. परंतु बाह भागामधील चौसिंगी गावात असे काहीतरी घडले ज्याने पोलिस आणि ग्रामस्थांना चकित केले. या मद्य तस्कराने मद्यप्रेमींसाठी ४० फूट खोल विहीर खोदली. त्यात देशी दारू भरली. मद्यपान करणार्यांना या विहिरीवर यायचे आणि पैसे द्यायचे व दारू घेऊन जायचे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता गावकऱ्यांसाठी दारूच्या विहिरी केल्या, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी विहिरीतून देशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे.
दारू कोठे आहे याबद्दल पोलिसांनी प्रथम प्रश्न विचारले. ते दोघे आरोपी हे पोलिसांची दिशाभूल करीतच राहिले, मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यावर मात्र ते कबूल झाले. घराजवळ दारूसाठी विहीर खोदल्याची माहिती त्यांनी दिली. या आरोपीने सांगितले की, त्याने सेप्टिक टाकी सारखी दारूसाठी ४० फूट खोल अरुंद विहीर खोदली. त्यात दारूचे खोके लपवून ठेवले जायचे. ज्यांना मद्यपान करण्याची आवड होती, त्यांनी दोरखंडात काटा बांधला की, विहीरीत ठेवलेली दारूची पेटी बाहेर काढली जाई. निवडणुका किंवा सण-उत्सवाच्या वेळी दारूची दुकाने बंद ठेवली जात असत, त्यादिवशीसुद्धा ते नाममात्र दराने दारू विकत होते .