नाशिक – विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील वातानुकूलीत यंत्रणेचे तांब्याचे पाईप आणि वायर चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. यामुळे रात्रंदिवस कडेकोट बंदोबस्तात असलेल्या आयजी आॅफिसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार अर्जुन खेलुकर (रा.ना.रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. खेलुकर हे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत. गडकरी चौकापासून हाकेच्या अंतरावर विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे निवासस्थान आणि दुमजली कार्यालय आहे. या कार्यालयापाठी मागे नव्याने मिटींग हॉल तयार करण्यात आला असून त्यास चार वातानुकूलीत यंत्र लावण्यात आली आहे. पाच जिल्हयांची व्याप्ती असलेल्या या कार्यालयात दिवसरात्र पोलीसांचा गराडा असतांना ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मिटींग हॉलच्या वातानुकूलीत यंत्रणेच्या तांब्याचे पाईप आणि वायर असा सुमारे ३१ हजाराच्या सरकारी मालमत्तेवर चोरट्यांनी डल्ला मारला. विशेष म्हणजे हा मुद्देमाल कापून नेला असून ही घटना गुरूवारी (दि.३) सकाळी उघडकीस आली. वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस दप्तरी याप्रकरणाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बी.के.चतुर करीत आहेत.