लोकटक लेक (मणिपूर)
‘देखो अपना देश’ या आपल्या मालिकेत आजचे ठिकाण अगदीच हटके आहे यात काहीच शंका नाही. देशाच्या छोट्याशा राज्याच्या पोतडीतून आपल्यासाठी एक अनोखी सफर फक्त तुमच्यासाठी…..लोकटक लेक, मणिपूर.
खरं तर लोकटक लेक या तलावास केवळ तलाव म्हणणे पर्यटकांची दिशाभूल करण्यासारखे ठरेल. ईशान्य भारतातील मणिपूर मधील हा तलाव या भागातील सगळ्यात मोठा गोड्या पाण्याचा तलाव आहे. मणिपूर राज्याच्या बिष्णूपूर जिल्ह्यातील हा तलाव इंफाळ पासून ५३ किलोमीटर अंतरावर आहे. या तलावात अनेक छोटी तरंगती बेटे सुद्धा आहेत. यास स्थानिक लोक फुमडी तलाव असेही म्हणतात.
या बेटांवर लोकांची वस्ती आहे, असे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हो, खरंच येथे लोक राहतात. या तरंगत्या बेटांवर त्यांची घरे आहेत. मुलांच्या शाळा आहेत. हे सर्व बघणे म्हणजे एक सुखद धक्काच आहे. कारण हे सर्व बघण्यासाठी पर्यटक कंबोडिया येथे जातात. पण वैविध्यतेने नटलेल्या आपल्या देशात लोकटक तलावात तरंगती बेटे, शेती, घरे आहेत. मासेमारी हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.
या तलावाचे क्षेत्रफळ २८७ चौरस किलोमीटर एवढे आहे.तलावाच्या परिसरात लहान-मोठी ५५ गावे आहेत. गावांमध्ये साधारण १ लाख लोक राहतात. यावरुन आपण अंदाज करु शकता की हा किती मोठा परिसर आहे. दरवर्षी येथील नागरिक १५ ऑक्टोबरला लोकटक दिवस साजरा करतात. या तलावाच्या आग्नेय दिशेला ४० चौरस किलोमीटर आकाराचे एक सर्वात मोठे बेट असून यावर किबूल लांमजाॅ हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे.
मणिपूरच्या आर्थिक विकासात या तलावाचे मोठे योगदान आहे. तलावाच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेती, मासेमारी, जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो. अर्थात या सर्व मानवी हस्तक्षेपामुळे या तलावाची नैसर्गिक हानी होत आहे. लोकटक येथील पर्यावरणाच्या गंभीर समस्येचे परीक्षण करणारा फॅम शॅंग नावाचा शोधपट प्रदर्शित झाला आहे.
लोकटक तलावात बोटींगचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. भरपूर पाणी असल्याने येथील पक्षी जीवनही समृद्ध आहे.
केव्हा जाल
या भागाचे पर्जन्यमान इतर भारताच्या तुलनेत सरासरीपेक्षा जास्त आहे. इथे जवळपास वर्षभर पाऊस पडतो. त्यामुळे फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यात भेट देणे योग्य असते. या काळात हवामानही छान असते.
कसे पोहचाल
इंफाळ हे विमानतळ येथून फक्त ४५ किलोमीटर अंतरावर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन जरीबां हे २४० किलोमीटरवर आहे. या दोन्ही ठिकाणांपासून रस्तेमार्ग लोकटक येथे जाता येते.
निवास व्यवस्था
या तलावामध्ये एकच रिसाॅर्ट असून तेथे फक्त उन्हाळ्यातच राहता येते. मात्र इंफाळ येथे भरपूर चांगली हाॅटेल्स आहेत.