स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिल्या आठवणींना उजाळा
पिंपळगाव बसवंत : अनेकदा कदंब निवासात दादांची भेट घेतली… दादांनी कधीच तासाभरापेक्षा कमी वेळ दिला नाही. मी गेलो की दादा मला बंगल्याशेजारच्या झाडाखाली घेऊन जायचे…तिथं काम करणाऱ्यांना कोणाचाही फोन घेऊ नको मला संदीपशी गप्पा मारायच्यात मनसोक्त… असं म्हणायचे.. मग चहा घेता घेता आमचा गप्पांचा प्रवास सुरु व्हायचा..कवितेपासून तर शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीबद्दल..दादा मला बोलतं करायचे..नवी कविता समजून घ्यायचे..तू पहिलं पुस्तक मला न सांगता परस्पर केलं…तुझा दुसरा कविता संग्रह मी करणार, असं हक्काने म्हणायचे.. मी स्वाभिमानीचा प्रदेशाध्यक्ष झालो तेव्हा दादांचे आशीर्वाद घ्यायला गेलो. अग्निकुंडात उडी घेतलीस तू… मोठी जवाबदारी पार पाडताना होरपळशील.. पण तुझी कविता प्रत्यक्ष जगण्याचा आनंद मात्र मिळवशील..जोरदार काम कर…! अन् पाठीवर हात टाकला…
चिंचखेडचा विषय निघाला की दादा आमचे वसंतराव कसे आहे..? आमच्या गावचे वसंतराव पाटील (वकील साहेब) यांच्या बाबत मात्र नेहमी आस्थेने चौकशी करायचे..एक वेळेस माझा गावातील मित्र योगेश संधान व मी दादांना भेटायला गेलो..राजकारणाचा विषय निघाला..दादांनी सरपंच ते मंत्री हा फार रोचक प्रवास खुमासदार पद्धतीनं सांगितला..चार तास कसे संपले आम्हाला कळलं नाही..कवी तुकाराम धांडे यांच्या गाजलेल्या कविता संग्रहाची जुळवा जुळव मी, तुकाराम व दादा दिवसभर करत होतो..
पायावर डोकं टेकवावं..असे फार थोडे पाय नाशिक जिल्ह्यात आहे..त्यातील आज विनायकदादा आपल्यात नाही. हे फारच धक्कादायक आहे. राजकारणात राहून ऋषितुल्य असणाऱ्या दादांना अंतःकरणातून नमन…!!