बिनरस्त्याच्या वाडीसाठी भक्कम रस्ता करणार असल्याचा दिला शब्द
धामडकीवाडी पॅटर्नचे प्रमोद परदेशी यांचा उपक्रम राज्यात राबवण्यासाठी होणार प्रयत्न
नाशिक – कोरोना काळात शृंखला तुटलेल्या शिक्षणासाठी राज्यभरात उपयुक्त ठरलेल्या टीव्हीवरच्या शाळेच्या धामडकीवाडी पॅटर्नची पाहणी इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी केली. खाचखळगे आणि दगड गोट्यांच्या रस्त्याने एक किलोमीटर पायपीट करून गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे यांनी धामडकीवाडी गाठली. बिनरस्त्याच्या अतिदुर्गम धामडकीवाडीसाठी लवकरच भक्कम रस्ता करणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला. चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी मोबाईल नेटवर्क नसतांनाही येथील शिक्षक प्रमोद परदेशी यांनी टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न यशस्वी केला. हा पथदर्शी प्रकल्प राज्यभरात अतिदुर्गम भागासाठी बहु उपयोगी असल्याने राज्याच्या शिक्षण विभागाला सविस्तर कळवणार असल्याचेही ते म्हणाले.
कोरोनाच्या उद्रेकामुळे राज्यभर शाळांमधील किलबिलाट थांबलेला आहे. यामुळे अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा विसर पडू लागल्याचा दुष्परिणाम व्हायला लागला. ऑनलाईन शिक्षण द्यावे तर मोबाईलला नेटवर्क नाही. पेचात सापडलेले इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न सूक्ष्म नियोजनाने यशस्वी केला.
राज्याचा शिक्षण विभाग, शिक्षण संचालनालय, शिक्षण तज्ञ, टिलिमिली आदींनी दखल घेऊन टीव्हीवरच्या शाळेची प्रशंसा केली. याबाबत इगतपुरीचे गटविकास अधिकारी किरण जाधव यांना विशेष उत्सुकता होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे, केंद्रप्रमुख श्रीराम आहेर, शिक्षक संघटनेचे नेते निवृत्ती नाठे यांच्यासह धामडकीवाडीला भेट दिली. रस्ता नसलेली इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी येथे जाण्यासाठी अधिकाऱ्यांना खाचखळग्यांचा आणि दगड गोट्यांचा एक किलोमीटर रस्ता तुडवावा लागला.
धामडकीवाडी गावात पोहोचल्यावर चावडीवर लावलेल्या टीव्ही समोर बसून चिमुरडे विद्यार्थी आनंददायी शिक्षणाचे धडे गिरवत असतांना दिसले. घरांमध्येही टीव्हीवर धामडकीवाडी पॅटर्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्वतः अजमावून पाहिले. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली. टीव्हीवर प्रसारण होणाऱ्या यंत्रणेची सविस्तर माहिती गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी घेऊन प्रात्यक्षिक घेतले.
टीव्हीवरच्या धामडकीवाडी पॅटर्नबाबत मुख्याध्यापक प्रमोद परदेशी, सहकारी शिक्षक दत्तू निसरड, व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकुळ आगीवले, शिक्षणप्रेमी स्वयंसेवक बबन आगीवले, केबल तज्ञ अमजद पटेल यांनी अधिकाऱ्यांना उपक्रमाचे प्रभावी सादरीकरण केले. पेहेचान प्रगती फाउंडेशनच्या प्रगती अजमेरा, अभिनव अजमेरा यांच्या आर्थिक साहाय्याने हा बहुमोल उपक्रम नावलौकिक मिळवत आहे. उपस्थित अधिकाऱ्यांनी उपक्रमाचे विशेष कौतुक करून धामडकीवाडी पॅटर्न राज्यभर विशेष पथदर्शी प्रकल्प म्हणून स्वीकारण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाला विनंती करणार असल्याचे गौरवोद्गार काढले. याप्रसंगी गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते गावकऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले. गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांचे औक्षण करून आदिवासी पद्धतीने रानमुलांचे गुच्छ देऊन स्वागत केले.
■ धामडकीवाडीला आगामी काही महिन्यात भक्कम रस्ता बनवून पुढील भेट शासकीय मोटारीने करू असा त्यांनी शब्द देऊन कार्यवाही सुरू केली आहे.
■ स्वातंत्र्यानंतर प्रथमच धामडकीवाडीमध्ये गटविकास अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याने भेट दिली. आदिवासी अतिदुर्गम भागात पायपीट करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.