नवी दिल्ली – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आगामी वर्षभर देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये साबरमती आश्रमातून प्रतिकात्मक दांडी यात्रेला हिरवा झेंडा दाखवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे.
लोकसहभागाच्या भावनेतून लोकोत्सवाच्या रूपात वर्षभर हा सोहळा होणार आहे. राज्यातही मुंबई पुणे आणि वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून या सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे. १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवाच्या आधी ७५ आठवडे होणाऱ्या या कार्यक्रमांची सुरुवात उद्यापासून होणार आहे.
१२ मार्च १९३० रोजी महात्मा गांधीजीनी मिठाच्या कायद्याच्या विरोधात साबरमती आश्रमातून ८१ कार्यकर्त्यांच्या सोबतीनं दांडी यात्रेला प्रारंभ केला होता. उद्या निघणाऱ्या प्रतीकात्मक पदयात्रेतही ८१ जण सहभागी होणार आहेत. २४१ मैलांचा २५ दिवसांचा प्रवास करून ही प्रतीकात्मक दांडीयात्रा ५ एप्रिल रोजी नवसारी जिल्ह्यात दांडी इथं पोहीचेल.
केंद्रीय सांस्कृतिक कामकाज मंत्री प्रह्लाद पटेल या पदयात्रेच्या पहिल्या टप्प्यात ७५ किलोमीटरपर्यंत सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते उद्या अनेक सांस्कृतिक आणि डिजिटल कार्यक्रमांचाही प्रारंभ होणार आहे. यावेळी पंतप्रधान साबरमती आश्रमामध्ये जमलेल्या लोकांना संबोधित करणार आहेत.
देशभरात विविध राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनानंही यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, सांस्कृतिक कामकाज मंत्रालय, युवक आणि क्रीडा मंत्रालय तसंच ट्राइफेडनं देखील यानिमित्तानं कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.
राज्यातही वर्ध्यातल्या सेवाग्राम आश्रमासह मुंबई आणि पुणे अशा तीन ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात क्रांती स्तंभाला अभिवादन करणार आहेत; त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक आणि महिला खेळाडुंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला जाईल. तर पुण्यात आगा खान पॅलेस इथं १३ मार्च रोजी माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं प्रदर्शनाचं उद्घाटन होईल. येत्या १५ मार्चपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे.