भगूर – स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी व कर्मभूमी नाशिक असल्याने व ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन स्थळाला स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी असे नाव देण्याची मागणी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाने साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांकडे केलेली होती. या मागणीच्या वेळी नाव देण्याबाबतची संपूर्ण भूमिका निवेदनात विशद केली होती. असे असतानाही आयोजकांनी जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याचे टाळले. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्यावतीने निषेधाचा वार्ताफलक लिहिल्याचे या समुहाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
या फलकामागील भूमिका सांगतांना सावरकर समूहाने सांगितले की, काहीजण बुद्धिभेद करून यांचा कुसुमाग्रज यांच्या नावाला विरोध असल्याचे भासवत आहेत. वस्तुतः सावरकर, कुसुमाग्रज, कानेटकर, गोविंदाग्रज, रामदास स्वामी या सर्वांचेच कार्य हे असामान्यच आहे. त्यामुळे मराठी माणूस म्हणून असा विरोध असण्याचे काही एक कारण नाही. मात्र ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रत्येक ठिकाणी अन्याय केला जातो. त्यांच्या नावाला विरोध केला जातो. या गोष्टी जनतेसमोर येणे आवश्यक आहे. म्हणून हा निषेध नोंदविण्यात आलेला आहे. १ फेब्रुवारी १९६६ साली स्वातंत्र्यवीरांनी आपल्या अंतिम समयी आपले कार्य समाप्त झाले. म्हणून त्यांच्या जन्मभूमी भगूर येथे साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा जाहीर निषेध करण्यासाठी हा फलक सोमवारी लावल्याचे भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.