जिल्ह्यातील नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमीत्त मन:पूर्वक शुभेच्छा! एका वेगळ्या परिस्थितीत हा दिवस आपण साजरा करीत आहोत. संपूर्ण देश कोरोनासारख्या संकटाचा मुकाबला करीत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने मनुष्यबळाची मर्यादा असताना देखील चांगली कामगिरी केली आहे. आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत संसर्ग नियंत्रित ठेवण्यात आपल्याला यश आले आहे. ६०० बाधित उपचारानंतर बरे झाले आहेत.
कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी अनेक डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, महसूल यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. त्यांना आपल्या सर्वांच्यावतीने मन:पूर्वक धन्यवाद देतो. काही कोरोना योद्धे, पत्रकार यांनीदेखील कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्या सर्वांचे अभिनंदन करतो.
खावटी अनुदान योजनेचा मोठा निर्णय
कोवीडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना खावटी अनुदान देण्याचा निर्णय नुकताच मंत्रीमंडळ बैठकीत घेतला असून राज्यातील अनुसूचित जमातीच्या ११ लाख ५५ हजार लाभार्थी कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे. पूर्वी कर्ज स्वरुपात असलेली ही योजना आता एक वर्षासाठी अनुदान तत्वावर सुरू करण्यात आली आहे. कोविड विषाणुमुळे निर्माण झालेली आपात्कालीन परिस्थिती लक्षात घेवून प्रतिकुटुंब ४ हजार रुपये अनुदान देण्यात येणार असून त्यापैकी रोख २ हजार रुपये कुटुंबांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहेत. तर एका कुटुंबास मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीदडाळ, तूरडाळ, साखर, शेंगदाणे तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती असा २ हजार रुपये पर्यंतचा किराणा देण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत मनरेगावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर, आदिम व पारधी जमातीची सर्व कुटुंबे, जिल्हाधिकारी यांच्या शिफारशींनुसार गरजू आदिवासी कुटुंबे व वैयक्तिक वनहक्कधारक कुटुंबे यांचा समावेश राहणार आहे.
संकटाचा सामना करण्यासाठी सज्जता
कोरोनावर नियंत्रणासाठी जिल्ह्यात आपण सर्व आरोग्य यंत्रणा तयार ठेवली आहे. महिला रुग्णालयाची इमारतही तयार झाली असून त्याठिकाणी १०० ऑक्सिजन बेड आणि ५० व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था होणार आहे. साधारण ७५० बाधितांवर एकाचवेळी उपचार करण्याची तयारी आपण केली आहे. पण आपण सर्वांनी सहकार्य केले तर या आजारावर लवकर नियंत्रण करणे शक्य होईल. आपण मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि हात साबणाने स्वच्छ धुणे या तीन सूत्रांचा वापर करून कोरोनाला हरविण्यात प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर भर
कोरोना संकटाचे संधीत रुपांतर करून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे. महिला रुग्णालय इमारत पूर्ण झाली असून आरटीपीसीआर लॅब सुरू होत आहे. महिला रुग्णालयासाठी ७.५ कोटी तर लॅबसाठी दीड कोटी खर्च करण्यात आला आहे. अत्याधुनिक असे २० खाटांचे नेत्रचिकीत्सालय सुरू करण्यात येणार आहे. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या रक्तपेढीच्या माध्यमातून प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा वेगळे करता येणार आहे. लवकरच काही तांत्रिक बाबींच्या पूर्ततेनंतर वैद्यकीय महाविद्यालयदेखील सुरू होऊ शकेल. नवापूर येथे अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटर इमारतीचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
संकटकाळात शेतकऱ्यांना दिलासा
या संकटाच्या काळातही नागरिकांना आणि विशेषत: शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासन आणि प्रशासन करीत आहे. महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा २३ हजार ३१३ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यांचे १७५ कोटींचे कर्ज माफ करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना नव्याने पीककर्ज उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून १ लाख २१ हजार ३५४ शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. यावर्षी प्रतिकूल परिस्थितीतही ४ लाख २४ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. चालू वर्षात २००० हे. क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे उद्दीष्ट आहे. मागील वर्षाच्या ४१५ लाभार्थ्यांना २ कोटी ८३ लक्ष अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
मनरेगाच्या माध्यमातून रोजगार
कोरोना परिस्थिती गांभिर्यपूर्वक हाताळताना शासन आणि प्रशासनानो संवेदनशिलतेचा परिचय दिला आहे. कोरोना संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले असताना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ६४ हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. त्यांना ३७ कोटी रुपयांची मजूरी तात्काळ वितरीत करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना सहाय्य
संकटकाळात परराज्यातील व राज्याच्या इतर भागातील साधारण २५ हजार नागरिकांना बसेसद्वारे त्यांच्या गावी आणि राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यात आले. रेल्वेद्वारेदेखील परराज्यातील सुमारे ६ हजार नागरिकांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले. परप्रांतातील मजूरांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
आदिवासी बांधवांना तत्परतेने मदत
आदिवासी विभागातर्फे ३ हजार ६१५ नागरिकांना बस व रेल्वेद्वारे जिल्ह्यातील त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले. परराज्यातून आलेल्या मजूरांची माहिती सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याने संकलीत करून शासनाला सादर केली आहे. आदिवासी विकास महामंडळातर्फे शेतकऱ्यांकडून भरड धान्याची खरेदी करून त्याचे २३४१ गरजू कुटुंबांना वाटप करण्यात आले. पहाडी भागातील रानभाज्यांचे महत्व शहरापर्यंत पोहोचावे आणि त्यातून आदिवासी बांधवांना उत्पन्न मिळावे यासाठी आदिवासी दिनानिमित्त रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सातत्य ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
पुरवठा विभागाची चांगली कामगिरी
जिल्ह्यात गरजू कुटुंबांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. शिधापित्रकेसाठी न्यूक्लिअस बजेटमधून खर्च करण्यात आला. सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक प्रभावी करण्यात आलेली आहे. यापूर्वीच्या लाभार्थ्यांसोबत लॉकडाऊन काळात सुमारे ४० हजार नागरिकांचा यात समावेश करण्यात आला. आत्मनिर्भर योजनेअंतर्गत विनाशिधापत्रिका धारकांना ४६५३ शिधापित्रका वाटप करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून २१ हजार मे.टन तांदळाचे मोफत वाटप करण्यात आले आहे. शिवभोजन योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १२ केंद्रातून आतापर्यंत १ लाख ६८ हजार थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ होत आहे. या योजनेसाठी ४८ लाखाचे अनुदान देण्यात आले आहे.
शैक्षणिक प्रगतीचा उंचावणारा आलेख
जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेखही उंचावणारा आहे. कोरोना संकटकाळात शैक्षणिक गुणवत्तेसाठी चांगले प्रयत्न करण्यात आकांक्षित जिल्ह्यात नंदुरबार चौथ्या क्रमांकावर आहे. निती आयोगाने याबाबत जिल्ह्याचे विशेष अभिनंदन केले आहे. राज्यपाल महोदयांनीदेखील नंदुरबार दौऱ्यात येथील शैक्षणिक प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील १३८६ प्राथमिक शाळांपैकी १०५४ शाळा पालक, शिक्षक आणि समाज सहभागातून डिजीटल झाल्या आहेत. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळाने जिल्ह्यातील ३१० शाळांची निवड करून शाळा व्हर्चुअल करण्यास मान्यता दिली आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत वर्ग खोल्या दुरुस्ती व बांधकामासाठी चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याद्वारे ४० वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण बंद असताना मोबाईल ॲपच्या माध्यमातून शिक्षण देणे सुरू आहे. दुरदर्शनच्या माध्यमातूनदेखील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे.
प्रगतीचा विश्वास आणि सामुहिक प्रयत्न
विधानसभा निवडणूकीत जिल्ह्याने चांगली कामगिरी करीत नाशिक विभागात पुरस्कार मिळविला आहे. गेल्या तीन वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ५४ हजार घरकुले पुर्ण करण्यात आली असून ३५ हजार प्रगतीपथावर आहेत. या योजनेत समाविष्ट नसलेल्या व लाभ घेण्यास पात्र असलेल्यांचे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आले आहे. कौशल्य विकास, उद्योग, महिला सक्षमीकरणासंदर्भातही चांगले प्रयत्न होत आहेत. एकूणच जिल्ह्याला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेण्यासाठी आणि या संकटातून सावरण्यासाठी शासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. त्यासोबतच अर्थव्यवस्थेला गती देण्याचेही प्रयत्न आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी शिथीलता देण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास आणि निश्चय केल्यास येत्या काळात आपण कोरोनावर मात करू असा विश्वास मला वाटतो.
- ॲड. के. सी. पाडवी, पालकमंत्री, नंदुरबार जिल्हा