साधना
आशयगर्भ आणि वैचारिक लेखनाच्या बाबतीत स्वत:चा एक वेगळा ठसा आणि स्वत:ची एक वेगळी जागा प्रस्थापित केलेल्या ‘साधना’ दिवाळी अंकाने याही वर्षी त्यांच्या परंपरेला साजेसा असा दिवाळी अंक प्रकाशित केलेला आहे.
दरवर्षीप्रमाणे, एक मुख्य दिवाळी अंक तसेच युवकांना प्रेरित करेल असा युवा दिवाळी अंक आणि बालमनांना प्रेरणा देईल असा बालकुमार दिवाळी विशेषांक प्रकाशित करण्यात आलेला आहे. यंदा कोवीडच्या संकटामुळे दिवाळी अंकांच्या प्रतींची संख्या कमी करावी लागलेली असली तरीही गुणवत्तेच्या बाबतीत मात्र कोणतीही तडजोड केलेली नसल्याचे दिसून येते.
हे तिनही दिवाळी अंक त्या त्या वयोगटांतच नव्हे तर सर्वांनीच वाचावेत असे झालेले आहेत. मुख्य दिवाळी अंकामध्ये पहिला विभाग हा विविध मान्यवर व्यक्तींच्या जीवनकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा आहे. त्यात नानासाहेब गोरे यांच्यावर न्या. नरेंद्र चपळगावकर, डॉ. बाबा आढाव यांच्यावर प्रा. हरी नरके, बाबा भांड यांच्यावर फ. मु. शहाजिंदे, अतुल देऊळगावकर यांनी डॉ. अंहकारी दांपत्यावर, तर विनय हार्डीकर यांनी स्वामी अग्निवेश यांच्यावर लिहिलेले लेख अतिशय वाचनीय झालेले आहेत.
दुसऱ्या आणि तिसऱ्या विभागातही वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी केलेली दिसते. त्यामध्ये मीना कर्णिक, शैलेश माळोदे, अनिल अवचट, विश्वास वसेकर, मॅक्स्वेल लोपीस आदींचे लेख आहेत. ‘साधना’च्या मुखपृष्ठावर अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा तरुणपणातील फोटो झळकला आहे.
या शिवाय, युवा दिवाळी अंकही प्रेरणादायी युवकांची उमेद जागवणारी कहाणी आपल्यासमोर उलगडतो. त्यामध्ये अदिती सुबेदी, सावरपाडा ते रिओ आॅलिम्पिक झेप घेणारी कविता राऊत, चितळे ब्रँडच्या चौथ्या पिढीचा प्रतिनिधी इंद्रनील चितळे, प्रतिक सिन्हा यांचे अल्ट न्यूज आणि नांदेड ते हॉवर्ड अशी वाटचाल करणारा प्रेरणादायी युवक सूरज येंगडे या सगळ्यांविषयी वाचायला मिळणार आहे.
बालकुमार दिवाळी अंक हा लहान मुलांना प्रेरणा देणाऱ्या गोष्टी सांगतो. त्यामध्ये देशातील विविध राज्यांतील प्रेरणादायी मुले व त्यांचे वेगळेपण अधोरेखीत करण्यात आलेले आहे. त्यात नागालँडमध्ये जंगलात आजारी पडलेल्या आजीला मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या नातीची अर्थात म्होनबेनी एजुंग. तसेच बंदुकधारी गुंडांचा सामना करणारी आसामची गुंजन शर्मा, पाण्याच्या प्रेमात पडलेला तामिळनाडूचा चित्रेश, शरीराच्या वेळेचे गणित शोधणारा कर्नाटकचा समय गोदिका, संशोधक निर्माण करू पाहणारा तामिळनाडूचा टेनिथ आदित्य यांचे वैशिष्ट्य उलगडून दाखवणारे लेख लहान मुलांना निश्चितपणे आवडतील असे झालेले आहेत. ‘देशोदेशीचे ज्ञानेश्वर’ हा श्री. म. माटे यांनी पूर्वी लिहिलेला लेख या अंकात जाणीवपूर्वक समाविष्ट करण्यात आलेला आहे.
विचारशील आणि वाचनप्रेमी अशा प्रत्येक घरात हे तिनही अंक आवर्जून असायला हवेत. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना आवडतील, ते वाचनात रमतील अशा पद्धतीने त्याची साधी, स्वच्छ, नेटकी अशी मांडणी केली आहे. त्यातील आशय हेच अंकांचे बलस्थान आहे.
वाचकांनी हे तिनही अंक जरुर वाचावेत.
लेखन : पराग_पोतदार
अंकाचे तपशील पुढीलप्रमाणे :
दिवाळी अंक : साधना
संपादक – विनोद शिरसाट
संपर्क क्रमांक – ०२०२४४५९६३५
मूल्य : मुख्य अंक – २०० रुपये, युवा अंक – ५० रुपये, बालकुमार अंक : ४० रुपये.