संस्कृती
साहित्यकृतींची लेखनप्रेरणा आणि निर्मितीप्रक्रिया’ हा वेगळा विषय घेऊन ‘संस्कृती’ दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला आला आहे. अंकाच्या आशयाला साजेसे मुखपृष्ठ सुरेश नावडकर यांनी रेखाटले आहे.
लेखनासाठी विषय सुचतो तेव्हापासून लेखन पूर्ण होईपर्यंत लेखक नेमका कोणत्या मनोवस्थेतून जातो हे जाणून घेण्यासाठी हा दिवाळी नक्की वाचायला हवा. या अंकात कथा, कादंबरी, कविता, आत्मचरित्र, ललितगद्य, वैचारिक, आध्यत्मिक, सामाजिक, ऐतिहासिक, चरित्र, अनुवाद, पौराणिक, बालसहित्य या विषयांवर सातत्याने लेखन करत असलेल्या लेखकांची निवड केली आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. रामचंद्र देखणे यांनी ‘वारी : स्वरूप आणि परंपरा’ या त्यांच्या पुस्तक निर्मितीची अनुभूती नेटक्या शब्दात व्यक्त केली आहे. इतिहासाच्या अभ्यासक डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या ‘महाराणी येसूबाई’ या पुस्तकाच्या प्रक्रियेची कहाणी उलगडून सांगितली आहे. डॉ. महेंद्र कदम यांनी त्यांच्या ‘तणस’ या तिसऱ्या कादंबरीच्या निर्मितीची गोष्ट सांगितली आहे. डॉ. बाळासाहेब लबडे यांची गाजत असलेली ‘पिपिलिका मुक्तीधाम’ ही आगळी वेगळी कादंबरी कसा आकार घेत गेली त्याची कहाणी उलगडली आहे. सुरेश पाटील यांनी त्यांची दुसरी कादंबरी ‘नक्षलबारी’ या कादंबरीचा दाहक प्रवास सांगितला आहे. मेघा पाटील यांनी शेतकऱ्याच्या जगण्यावर भाष्य करणारी ‘शेतकरी नवरा’ ही कादंबरी लिहिताना कसे वेदनादायी अनुभव जमा झाले ते विषद केले आहे. याशिवाय डॉ. राजेंद्र थोरात, संजय ऐलवाड, तमन्ना इनामदार यांचे लेख वाचनीय आहेत.
साहित्य प्रेमी भगिनी मंडळ या पुण्यातील स्त्री साहित्यविषयक कार्य करणाऱ्या संस्थेच्या संशोधन विभागाचा ‘स्त्री साहित्याचा मागोवा’ हा त्रिखंडात्मक प्रकल्प पूर्ण करताना डॉ. मंदा खांडगे यांनी संपादक म्हणून सांगितलेले अनुभव उद्बोधक आहेत.
‘वाट तुडवताना’ या आत्मचरित्राचे लेखन करताना उत्तम कांबळे यांनी प्रेरणा, अनुभव, अडचणी याची सांगड कशी घातली याविषयी लेखन केले आहे. तर इंदुमती जोंधळे यांनीही ‘बिनपटाची चौकट’ हे आत्मचरित्र लिहिताना एक बाई म्हणून त्यांच्या जगण्याची झुंज लेखणीतून कशी उतरली हे स्पष्ट केले आहे. डॉ. नीलिमा गुंडी आणि प्रदीप पाटील यांचा कविता सुचण्यापासून कविता कागदावर उतरेपर्यंत पर्यंतचा प्रवास मंत्रमुग्ध करणारा आहे. बंडा जोशी, डॉ. राजेंद्र माने, लक्ष्मीकांत देशमुख आणि सुरेश पाटोळे यांचेही लेख मर्मग्राही आहेत.
याखेरीज उद्धव कानडे, वसंत केशव पाटील, प्रा. विश्वास वसेकर, संभाजी मलघे, एकनाथ आव्हाड, शिवाजी चाळक, कि. स. पवार, वि. द.पिंगळे, गणेश लोंढे, ज्योत्स्ना चांदगुडे, चंचल काळे, प्रभा सोनवणे, डॉ.संदीप अवचट, डॉ. नीलिमा गुंडी, वैशाली मोहिते आदींच्या उत्तमोत्तम कवितांनी काव्यविभाग सजला आहे
मनोरंजन आणि ज्ञानवर्धन करणारा अंक आवर्जून वाचावा असाच आहे.
लेखन – वैशाली मोहिते
अंकाचे तपशील पुढीलप्रमाणे :
दिवाळी अंक : संस्कृती
संपादक : सुनीताराजे पवार
मूल्य : २०० रुपये
संपर्क क्रमांक : ९८२३०६८२९२