संवादसेतू
‘‘काळ मोठा कठीण असूनही आम्ही दिवाळी अंकाच्या सुदीर्घ आणि संपन्न परंपरेत आमचाही इवला दीप लावला आहे.’’ अशी सुस्पष्ट आणि स्वागतार्ह भूमिका घेत ‘संवादसेतू’ हा दिवाळी अंक रसिकांच्या दरबारी दाखल झाला आहे.
चांगल्या विषयांची निवड, उत्तम दर्जेदार मजकूर आणि आकर्षक व प्रभावी मांडणी अशा सर्व निकषांवर उजवा ठरणारा असा हा अंक साकारलेला आहे.
फराळाच्या विविध प्रकारांनी सजलेले ताट आपल्या समोर यावे अगदी तशा पद्धतीने विविधभाषक प्रतिभावंतांची लेखनयात्रा, दमदार कथा, रसज्ञ अभ्यासकांचे ललित लेख, अर्कचित्रांची दुनिया, साहित्य सोनियाच्या खाणी, एकांताचे शोधपर्व अशा विभागांमध्ये या अंकात वाचनीय लेखांची शब्दश मेजवानी आहे. हिंदी, बंगाली, जर्मन भाषेतील भाषांतरित कथा पहिल्या भागात दिलेल्या आहेत.
मनोरंजनकार का. र. मित्र आणि सत्यजित राय यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने, प्रसिद्ध शायर आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष लेख अंकात समाविष्ट केलेले असून ते वाचनीय झाले आहेत.
कोरोनाच्या काळामध्ये सगळं विश्व जणू एकांतात कोंडलं गेलं होतं. अशा काळामध्ये सर्जनशील व्यक्तिमत्त्वांनी हा एकांताचा काळ कसा घालवला आणि त्या काळात नेमकं काय केलं या विषयी ‘एकांताचे शोधपर्व’ हा विभाग बरेच काही सांगून जातो. त्यामध्ये महेश एलकुंचवार, प्रभाकर कोलते, शमा भाटे, श्रुती सडोलीकर-काटकर, सानिया, मेधा पाटकर, गुलजार अशा दिग्गजांनी वाचकांशी संवाद साधला आहे. या शिवाय, पंकज कुरुलकर, मिलिंद बोकील, विलास केळसकर, डॉ. शुभांकर कुलकर्णी, श्री. म. माटे, रवीप्रकाश कुलकर्णी, विजय पाडळकर, मंदार कुलकर्णी, सानिया भालेराव, चित्रा वाघ, डॉ. राजीव पाठक, संतोष शिंत्रे आदींचे लेख वाचनीय आहेत. अंकाची मुखपृष्ठ व मांडणी श्री. मिलिंद जोशी यांनी केलेली आहे.
उत्तम विषयांची निवड करून त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न संवादसेतू या अंकाद्वारे यशस्वी झालेला आहे. एक दर्जेदार अंक म्हणून हा अंक वाचकांनी आवर्जून वाचायला हवा.
कोरोनाच्या काळामध्ये अनेकानेक आव्हानांशी झुंज देत याही वर्षी अंकाच्या परंपरेत खंड पडू न देता सातत्य राखून उत्तम अंक प्रकाशित केल्याबद्दल संपादक डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे ‘शब्दसारथी’ परिवाराच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन.
लेखन : पराग पोतदार
अंकाचे तपशील पुढीलप्रमाणे :
दिवाळी अंक : संवादसेतू
संपादक – डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
संपर्क क्रमांक – ९८२२०३३५६२, ९८८१०९८०४८
मूल्य : २५० रुपये.