जगभरात यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच करोनाचा आजार आला आणि तो अजूनही मुक्कामी आहे, त्यामुळे लोकांमध्ये भिती आणि तणाव आहे. आता हळूहळू सर्व काही पद पूर्वपदावर येत आहे. सर्व जीवन पुन्हा पहिल्यासारखे गतिमान आणि आनंदी होणार आहे. कारण मानव हा आशेवर जगणार आहे, हेही दिवस जातील अशी सर्वांना खात्री आहे. करोनाच्या स्थितीविरूध्द सर्व जण आपआपल्या पातळीवर लढत आहेत. त्यामुळे नेमके नुकसान किती झाले ? किती उद्योगधंदे बंद पडले ? किती जणांना रोजगार आला गेला ? किती जणांना आपले प्राण गमवावे लागले ? या सर्वांमुळे आपण मनुष्य नेमके किती वर्ष मागे गेलो याचा धांडोळा पुढील काही वर्षे घेतला जाणार आहे. एका मोठ्या संकटातून आपण काही सावरतोय.
संपूर्ण जगात काही काळ लॉकडाऊन झाले होते, सर्व व्यवहार ठप्प असतानाच ,त्यात वाचकांची आवडती ग्रंथालये आणि वाचनालये देखील बंद झाल्यावर प्रत्यक्ष नवी जुनी पुस्तके वाचण्याची आवड वाचकांना घेता येत नव्हती, याच काळात ऑनलाइन पुस्तक वाचनातून काही लोक खंबीर बनली. याचा आनंद थोडा थोडा वाढत होता. याच प्रयत्नात व्यासपीठने आपला अंक निर्मितीचा प्रवास सुरू ठेवला होता. साहित्य येत राहीले. लेखक, कवी अधिकारी-कर्मचारी, वाचक, रसिकांचा स्नेह कायम राहीला. त्यामुळे नेहमीप्रमाणे एक सुंदर, आकर्षक आणि वाचनीय अंक तयार झाला. या अंकात प्रमुख्याने महाराष्ट्र शासनाचे कोविड टास्क फोर्स कमिटीचे चेअरमन डॉ. संजय ओक यांच्या कोविड मुक्तीच्या दिशेने ही मुलाखत आहे. त्याचप्रमाणे कथा, कविता, लेख आदी विविध प्रकार यामध्ये आहेत. कथा प्रकारामध्ये प्रशांत असणारे, विलास शेळके, नितीन चंदनशिवे, हेमंत कोठीकर, वसंत वाहोकर, प्रणव कुलकर्णी आदींच्या आगळ्यावेगळ्या कथा आहेत.
लेखांमध्ये डॉ. संजय वनवे, मंदार ओलतीकर, सुरज मांढरे, देवेंद्र शिर्के, राजेंद्र शुक्ला, डॉ. संजय बेलसरे, धनंजय गोवर्धने, आदींचे लेख आहेत. तर कविता या प्रकारात देविदास जाधव, प्रणव कुलकर्णी, प्रा. इरफान शेख, रमेश सावंत, मुकुंद बाविस्कर, स्वाती पाचपांडे, सुधाकर कुलकर्णी, अमीन सय्यद विजयकुमार मीठे, अरुण इंगळे, ज्योती कदम, रेखा भंडारे आदींच्या कविता यामध्ये आहेत. व्यासपीठ दिवाळी अंकाचे हे २२ वे वर्ष असून साधारणतः दोन तपांची साहित्य वाटचाल एक विशिष्ट ध्येयातून आणि जाणिवेतून झालेली दिसते. नामवंत साहित्यकांबरोबरच शासन सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांनी देखील या अंकातून लिहिलेले आहे. यापूर्वी मोठ्या संख्येने आणि सहजपणे अशी व्यक्ती क्वचितच रसिक वाचकांनी अनुभवली दिसते. कोरोना काळात दिवाळीनिमित वाचकांना आगळीवेगळी वाचनीय मेजवाणी जबाबदारी संपादक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली आणि ती यशस्वी पार पाडली. विशेष म्हणजे दिवाळी अंकाचे धनंजय गोवर्धने यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ आकर्षक आणि सुंदर आहे. तसेच अंतर्गत सजावट आणि व्यंगचित्र छान आहे.
लेखन – मुकुंद बाविस्कर
दिवाळी अंकाचे तपशिल असे :
दिवाळी अंक – व्यासपीठ
संपादक- हेमंत पोतदार
संपर्क क्रमांक-९८५०५०१२४७
स्वागत मूल्य- २५० रुपये.