विचार भारती
विचारभारती या मासिकाने उत्तम आशयाच्या बळावर साहित्यविश्वात दमदार ठसा उमटवलेला आहे. विचारभारती अंकाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने यंदाच्या दिवाळी अंकाला विशेष महत्त्व होते. त्या पार्श्ववभूमीवर, या वेळी ‘संमेलनाध्यक्ष साहित्य विशेषांक’ काढण्यात आला आहे.
मराठी साहित्य रसिकांच्या मनामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे महत्त्व वेगळे आहे. त्याचे संमेलनाध्यक्ष समाजाचे वैचारिक नेतृत्व करतात अशी मराठी वाचकांची भावना असते. त्यांना समाजात एक विशेष आदर असतो. त्यांचे विचार समाजाला खऱ्या अर्थाने दिशा देतात असे मानले जाते. त्या पार्श्ववभूमीवर, आजवरच्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद भूषविलेल्या संमेलनाध्यक्षांचे वैचारिक लेख यात समाविष्ट केलेले आहेत. असे सर्व संमेलनाध्यक्षांचे लेख एकत्रित वाचायला मिळणे ही वाचकांसाठी सुद्धा एक पर्वणीच ठरणार आहे.
या अंकामध्ये शंकरराव खरात, यु. म. पठाण, मधु मंगेश कुलकर्णी, द. मा. मिरासदार, विजया राजाध्यक्ष, राजेंद्र बनहट्टी, मारुती चितमपल्ली, अरुण साधू, म. द. हातकणंगलेकर, आनंद यादव, उत्तम कांबळे, वसंत आबाजी डहाके, नागनाथ कोतापल्ले, फ. मु. शिंदे, सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस, अक्षयकुमार काळे, लक्ष्मीकांत देशमुख, अरुणा ढेरे, फ्रान्सिस दिब्रेतो अशा सर्व मान्यवर साहित्यिकांचे लेख यात वाचायला मिळतील.
प्रत्येक संमेलनाध्यक्षांचे अनुभवविश्व वेगळे असल्याने आणि लेखनशैलीची प्रकृती भिन्न असल्याने विविध्यपूर्ण वाचनाचा आनंद या अंकातून नक्कीच मिळतो.
संपादक प्रा. मिलिंद जोशी आणि रवींद्र बेडकिहाळ यांच्या संपादकीय प्रयत्नांतून संग्राह्य ठेवावा असा एक अंक साकारण्यात आलेला आहे. त्याबद्दल ‘विचारभारती’च्या संपादकीय मंडळाचे ‘शब्दसारथी’च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन!
मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांनी हा अंक जरुर वाचावा.
लेखन : पराग पोतदार
अंकाचे तपशील पुढीलप्रमाणे :
दिवाळी अंक : विचारभारती
संपादक – प्रा_मिलिंद_जोशी
संपर्क क्रमांक – 9850270823
मूल्य : 100 रुपये.