मौज
दीपावली आणि दिवाळी अंकांचं नातं फार वेगळं आहे. दिवाळी फराळाचा जसा आनंद मनसोक्त घेतला जातो तसे निवडक दिवाळी अंक घरी आणून रसिक मराठी वाचक आपली वाचनाचीही भूक भागवत असतो.
नवा आकाशकंदिल जसा न चुकता दरवर्षी घरात आनंदाचा प्रकाश घेऊन येतो तसेच काही दिवाळी अंक न चुकता मराठी रसिकाच्या घरी शब्दानंद घेऊन दाखल झालेले असतात.
या निवडक दिवाळी अंकांमध्ये ‘मौज’चा दिवाळी अंक नक्कीच असतो. ‘मौज’च्या या वर्षीच्या दिवाळी अंकानेही दर्जेदार मजकूराची परंपरा जपली असून एक चांगला दिवाळी अंक साकारलेला आहे. अवघ्या जगावरील कोरोनाचे आव्हान लक्षात घेता, शाश्वत कलांचा आणि आनंदाचा वेध घेण्याचा प्रयत्न या अंकाद्वारे करण्यात आलेला आहे. कलाविषयक, विज्ञाननिष्ठ, ललित, वैचारिक, प्रवासवर्णनपर, व्यक्तिचित्रात्मक असे विविध साहित्यप्रकारांचा वेध घेणारे लेखन या अंकात समाविष्ट असल्याने संपूर्ण अंक वाचनीय झालेला आहे.
भारतीय चित्रकलेच्या क्षितीजावर अग्रेसर राहिलेली चित्रकार अमृता शेरगील यांनी काढलेले सुंदर चित्र दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ म्हणून निवडण्यात आलेले आहे. प्रभाकर कोलते यांनी त्यांच्या कलाकर्तृत्वाचा आढावा ‘चित्रकलेतील ध्यासपर्व’ या लेखाद्वारे घेतला आहे. मिलिंद बोकील यांनी टीपलेला अफगाणिस्तान आणि राणी दुर्वे यांनी शब्दांतून चितारलेला हिमालय ही दोन्ही प्रवासवर्णने आपल्याला त्या विश्वात घेऊन जातात. व्यक्तीचित्रणात्मक लेखामध्ये हरी नरके यांनी आपल्या वडीलभावाच्या आयुष्याचे चित्रण केले आहे. तर प्रसिद्धीपराङ्मुख अशा विजय देव सरांचे वीणा देव यांनी साकारलेले व्यक्तिमत्त्व आवर्जून वाचावे असे आहे. तर डॉ. अनिल अवचट यांनी त्यांची जुनी मैत्रीण सुमित्रा महाजन यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध सुंदररीतीने घेतलेला आहे.
या अंकातील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, गोदावरी परुळेकर यांनी आदिवासींवर लिहिलेल्या ‘जेव्हा माणूस जागा होतो’ या पुस्तकाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने गेल्या ५० वर्षांतील आदिवासींच्या विकासाचा सर्वांगीण वेध घेण्याचा प्रयत्न परिसंवादाच्या रूपाने करण्यात आला आहे. त्याचे संयोजन हेरंब कुलकर्णी यांनी केले असून त्यात मेधा पाटकर, प्रकाश आमटे यांच्यासह अशोक ढवळे, विवेक पंडीत, पूर्णिमा उपाध्याय, बंड्या साने, वाहरू सोनवणे या आदिवासींसाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनीही लेखन केले आहे.
सानिया यांची प्रगल्भ दीर्घकथा आणि ज्येष्ठ लेखक वसंत मिरासदार यांची खुमासदार विनोदी कथा दोन्ही वाचनीय आहेत. याशिवाय, रश्मी कशेळकर, नंदू मुलमुले, अंबरीश मिश्र यांचे ललित लेख म्हणजे तर मेजवानी आहे. त्यामुळे आवर्जून वाचावा आणि वाचनाचा निखळ आनंद मिळवावा इतका सुंदर अंक झालेला आहे.
आणखी एक विशेष म्हणजे हा दिवाळी अंक मराठीतील पहिला आॅडिओ दिवाळी अंक ठरणार आहे. स्टोरीटेल या अॅपवरून हा अंक डाऊनलोड करून ऐकता येऊ शकणार आहे. वाचकांनी हा अंक जरूर विकत घेऊन वाचावा अथवा ऐकावा!
लेखन : पराग पोतदार व आरती जोशी
अंकाचे तपशील पुढीलप्रमाणे :
दिवाळी अंक : मौज
संपादक – मोनिका गजेंद्रगडकर
संपर्क क्रमांक – २३८७१०५०, २३८७२४२६
मूल्य २५० रुपये.