भवताल
साध्या डोळ्यांनाही न दिसणारा एक सूक्ष्मजीव आला आणि त्याने अवघ्या जगाला वेठीस धरलं..
ते अगदी आत्ताच्या या क्षणापर्यंत!
सारं काही सुरळीत चाललेलं होतं. पण अचानक चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना नामक एका विषाणूचा उदय झाला आणि अल्पावधीत हा विषाणू जगभरात पसरला. त्यानंतरचा कहर, संसर्गाची लाट, मनात बसलेली भीती, त्यानंतर आलेले लॉकडाऊन… या सगळ्या परिस्थितीतून आपण सारेचजण जातो आहोत. हे सारे घडून आले ते एका सूक्ष्मजीवामुळे. त्यामुळे ‘भवताल’ने यंदाचा दिवाळी अंक काढायचा ठरवला तोच मुळी सूक्ष्मजीवांवर!
सूक्ष्मजीवांचे हे जग नेमके आहे तरी कसे आणि त्या संबंधातील शास्त्रशुद्ध आणि इत्थंभूत माहिती देण्याचा प्रयत्न या अंकात करण्यात आलेला आहे. यातील विषयांची निवड, अभ्यासपूर्ण मांडणी, मान्यवर लेखक, विषयांचे वेगळेपण आणि त्यांचा माहितीपूर्ण आशय हे सारे पाहता हा एक उत्तम दस्तावेज ठरावा इतका सुंदर अंक साकारण्यात नक्कीच यश आले आहे.
या अंकाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे, आजवरच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठांच्या परंपरेला पूर्णपणे फाटा देत एक अत्यंत धाडसी प्रयोग मुखपृष्ठावर केलेला आहे. सूक्ष्मजीव विशेषांक असल्याने संपूर्ण काळ्या पार्श्वभूमीवर केंद्रस्थानी एक छोटासा सूक्ष्मजीवाचा ठिपका काढून आजवरचे सर्वांत वेगळे मुखपृष्ठ साकारलेले आहे.
हे मुखपृष्ठ साकारले आहे आमचे सन्मित्र प्रभाकर भोसले यांनी. त्यांनी यंदाच्या दिवाळी अंकांमध्ये अगदी विरोधाभासी असे दोन प्रयोग करून पाहिले आहेत. ते वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ‘थिंक पॉझिटिव्ह’ या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ साकारताना सर्वांत मोठी अक्षरे मुखपृष्ठावर झळकली आहेत तर ‘भवताल’चे मुखपृष्ठ साकारताना सर्वांत लहान चित्राचा वापर करून सूक्ष्मजीव विशेषांक असल्याचे समर्पकरीतीने अधोरेखीत केले आहे.
सृष्टीतील सूक्ष्मजीवांचे महत्त्व सांगतानाच त्यांचे माणसांशी असणारे नाते उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न या अंकाद्वारे करण्यात आला आहे. या अंकाचे अतिथी संपादक म्हणून श्री. योगेश शौचे यांनी धुरा सांभाळलेली आहे. सहसंपादक म्हणून अभिजीत सोनवणे यांनी मेहनत घेतली आहे.
‘सीएसआयआर’ चे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी लिहिलेला ‘कोविडचा धडा’ आणि राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद साहू यांचा दुसरी लाट टाळण्यासाठी हे विशेष लेख आजची परिस्थिती आणि उद्याचे आव्हान यांचा वेध घेणारे आहेत. या शिवाय, ‘पृथ्वीवर सूक्ष्मजीव उपराच?’ हा अभ्यासपूर्ण लेख प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी लिहिलेला आहे.
सूक्ष्मजीवांचे सृष्टीतील स्थान व भूमिका यावर डॉ. गिरीश महाजन यांचा लेख अभ्यासपूर्ण आहे. उत्क्रांतीचे मेरुमणी हा डॉ. मिलिंद वाटवे यांचाही लेख वाचनीय आहे. माणसांशी असणारे सूक्ष्मजीवांचे नाते उलगडण्यासाठी डॉ. सुभाष वाळिंबे, डॉ. प्रदीप आवटे, डॉ. राहुल बोडखे, डॉ. राघवेंद्र गायकैवारी, डॉ. राजन वाल्हे, डॉ. मंगेश गोखले यांनी लेखन केले आहे. वैद्यकीय अंगाने लिहिलेले लेखही अभ्यासपूर्ण आहेत. त्यामध्ये ‘लसीकरण-काल, आज आणि उद्या’ हा डॉ. अविनाश भोंडवे यांचा लेख उत्तम आहे.
आजवरच्या इतिहासात साथीच्या रोगांनी काय काय परिस्थिती निर्माण केली होती याचाही एक स्वतंत्र विभाग केलेला आहे आणि या रोगनिर्मूलनाच्या प्रक्रियेत ज्या जागतिक संस्था आपले योगदान देत आहेत त्यांचीही माहिती यात देण्यात आलेली आहे. त्यामुळे अत्यंत सूक्ष्म असणाऱ्या या जीवांचा वेध मात्र व्यापकतेने घेण्यात हा अंक निश्चितपणे यशस्वी ठरलेला आहे.
वाचकांनी हा अंक जरुर वाचावा.
लेखन : पराग पोतदार
अंकाचे तपशील पुढीलप्रमाणे :
दिवाळी अंक : भवताल
संपादक – अभिजित घोरपडे
संपर्क क्रमांक – ९५४५३५०८६२
मूल्य : २५० रुपये