प्रतिभा
दिवाळी अंकांच्या पारंपरिक चौकटी भेदून अनेकानेक नवे प्रयोग करण्याचे धाडस गेल्या दशकभरापासून प्राधान्याने दिसू लागले आहे. दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ म्हणजे स्त्रीचे चित्र हासुद्धा एक झापडबंदपणा आता मोडकळीस निघाला आहे. दिवाळी अंकातील विषयांच्या निवडीपासून ते त्याच्या मांडणीपर्यंत आपले म्हणून वेगळेपण कसे राखता येईल आणि काही नवे प्रयोग करून कसे पाहता येतील याकडे चांगल्या दिवाळी अंकांचा ओढा दिसतो आणि तो स्वागतार्हही म्हणायला हवा.
दिवाळी अंकातील ही प्रयोगशीलताच जपत असाच एक उत्तम प्रयोग केला आहे प्रतिभा या दिवाळी अंकाने.
‘आयुष्यावर पुस्तकांनी पाडलेला प्रभाव’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून प्रतिभा दिवाळी अंकातील अनेक पाने सजलेली आहेत. ‘स्वत:चा शोध घेण्याची संधी’ असे मानून मान्यवर लेखकांनी या कल्पनेचे स्वागत केले. राजन गवस, इंद्रजित भालेराव, नीलांबरी जोशी, प्रणव सखदेव, अशोक बाबर, रणधीर शिंदे, कृष्णात पिंगळे, साहिल शेख व सुनिता डागा यांनी लेखाद्वारे आपल्या जडणघडणीतील पुस्तकांचे योगदान उलगडून दाखवले आहे. नवोदित वाचकांना दिशा मिळावी म्हणून त्यांच्या आवडीच्या दहा पुस्तकांची नावेही लेखानंतर आवर्जून दिलेली आहेत.
या शिवाय, दिवाळी अंकात कथा, लेख, ललितचित्रण, व्यक्तीचित्रण आणि काव्यविभाग अशी वाचनासाठीची भरपूर रेलचेल आहे. त्यामध्ये, वसीम मणेर, ऐश्वर्य पाटेकर, हिनाकौसर खान-पिंजार, प्रमोद कोपर्डे यांच्या कथा आहेत. मनिषा पाटील, दीपक स्वामी, डॉ. राहुल गौर, गणेश मरकड, स्वप्निल बोरसे आदी उत्तमोत्तम कवींच्या कविताही समाविष्ट केलेल्या आहेत.
या अंकाच्या पाठीवर कौतुकाची आणखी एक थाप द्यावी ती या अंकाच्या उत्कृष्ट मुखपृष्ठासाठी!
अन्वर हुसेन यांनी अतिशय तरल आणि कलात्मक असे मुखपृष्ठ साकारलेले आहे.
अंकाची गुणवत्ता जपण्यासाठी संपादक धर्मवीर पाटील यांनी घेतलेली मेहनत पानापानांतून दिसते. अंकाची मांडणीदेखील उत्तम झालेली आहे. इस्लामपूरातून निघणारा हा प्रतिभा दिवाळी अंक राज्यभरातील वाचकांनी आवर्जून वाचावा असा झाला आहे.
लेखन : पराग पोतदार
अंकाचे तपशील पुढीलप्रमाणे :
दिवाळी अंक : प्रतिभा
संपादक – धर्मवीर पाटील
संपर्क क्रमांक – ७५८८५८६६७६
मूल्य : २०० रुपये.