पुण्यभूषण
दिवाळी अंकांच्या मालिकेमध्ये आपल्या वैशिष्ट्यांमुळे आणि दर्जेदार आशयामुळे स्वत:चे स्थान निर्माण केलेला दिवाळी अंक म्हणजे पुण्यभूषण. याहीवर्षी पुणेरी संस्कृती आणि पुणे शहराच्या अनुषंगाने विविध पैलू उलगडणाऱ्या विषयांचा समावेश यात करण्यात आलेला आहे.
पुण्यभूषणचे हे दहावे वर्ष. या सर्व वर्षांत सातत्याने दर्जेदार मजकूर रसिकजनांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये पुण्यभूषणने सातत्य राखले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संदर्भात, संपादकीय भूमिका स्पष्ट करताना श्री. सतीश देसाई यांनी म्हटले आहे, ‘कोणत्याही दिवाळी अंकाची दोन चाकं असतात.. एक आशयाचं आणि दुसरं अर्थकारणाचं. कोरोनाच्या साथीमुळे यंदा दिवाळी अंक निघणार की नाही अशा चर्चा सुरू झालेल्या असताना ‘पुण्यभूषण’ मात्र आशय आणि अर्थकारण या दोन्ही पातळ्यांवर भक्कमपणे उभे राहिले आणि दरवर्षीप्रमाणे दर्जेदार असा अंकच रसिक वाचकांसमोर सादर केला.’
यातील आशयाची आणि संपादनाची बाजू युनिक फिचर्सचे डॉ. सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी व गौरी कानेटकर यांनी समर्थपणे सांभाळली आहे. या अंकातील पहिले मानाचे पान फर्ग्युसन रस्त्यावरील वैशालीचे मालक जगन्नाथ शेट्टी यांना अर्पण करून ‘अस्सल पुणेकर’ म्हणून त्यांचा सन्मान केलेला आहे.
अंकामध्ये पुण्याशी संबंधित अनेकानेक उत्तम लेख आहेत. पुण्याची नव्याने ओळख करून देणारे आणि जुन्या पुण्याच्या आठवणी जागवणारे असे दुहेरी लेख असल्याने एक सुंदर मिलाफ जमून आला आहे.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या कॉलेजच्या दिवसांतील आठवणी जागवल्या आहेत. तर नोंद इतिहासाची’ या विभागामध्ये अरविंद गोखले, अमित गोळवलकर, राजीव साबडे, योगीराज प्रभुणे यांनी लेखन केले आहे. पुण्याचे हरित दूत हा गुरुदास नूलकर, साहस सापटणेकर यांचा लेख वाचनीय आहे. त्याचप्रमाणे अविनाश सोवनी यांनी ‘ही ऐतिहासिक स्थळं गेली कुठे?’ या विषयाचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. पुण्यातील स्त्री केंद्र मासिकं या वेगळ्या विषयावर निरंजन घाटे यांनी लेखन केले आहे.
ललित विभागामध्ये ‘पेठा नावाची आवाजी संस्कृती’ हा अनिल परांजपे यांचा व ‘जगप्रसिद्ध शहरं आणि पुणं’ हा मीना साठे यांचा लेख वाचनीय आहे. परदेशांतून लिहिणाऱ्या पुणेकरांचाही स्वतंत्र विभाग करण्यात आलेला आहे. यात पोर्टलंड, मेलबर्न, दुबई, टोरांटो आणि फेअरफॉक्स येथून पुणेकरांनी लिहिले आहे. विविध क्षेत्रांत उत्तम योगदान दिलेल्या पुणेकरांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी ‘सलाम’ हा स्वतंत्र विभागही देण्यात आलेला आहे.
एकूणात अंक वाचनीय झालेला असून पुण्यासंदर्भातील आपली जाण आणि जाणीव वाढवण्यासाठी हा अंक निश्चितपणे उपयुक्त ठरणार आहे. पुणेकर असलेल्यांनी आणि नसलेल्यांनीही आवर्जून वाचावा असा हा अंक आहे.
लेखन : पराग पोतदार
अंकाचे तपशील पुढीलप्रमाणे :
दिवाळी अंक : पुण्यभूषण
संपादक – डॉ. सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी
प्रकाशक – डॉ. सतीश देसाई, अध्यक्ष पुण्यभूषण फाउंडेशन
संपर्क क्रमांक – ९८२२०३८२७२
मूल्य : २०० रुपये.