दुर्गांच्या_देशातून…
एखादा विषय घेऊन सातत्याने त्या विषयाशी केंद्रित राहून दिवाळी अंक काढणं ही सोपी गोष्ट नव्हे. मात्र, इतिहासावरच्या आणि गडकोटांवरील निस्सिम प्रेमातून दरवर्षी साकारला जाणारा ‘दुर्गांच्या देशातून…’ हा दिवाळी अंक अनेकानेक दिवाळी अंकांच्या मांदियाळीमध्ये अगदी विशेषत्वाने उठून दिसतो.
दरवर्षी सातत्य राखून दुर्गांविषयीची व त्या अनुषंगाने जाज्वल्य अशा इतिहासाची अभ्यासपूर्ण माहिती वाचकांसमोर ठेवण्याचे मोठे काम करतो आहे. त्यामुळे या दिवाळी अंकाच्या पाठीवर एक कौतुकाची थाप नक्कीच द्यायला हवी.
या वर्षी कोरोनाचे आव्हान मोठे असताना आणि पुरेसे जाहिरातींचे पाठबळ नसतानाही त्यांनी दिवाळी अंकाच्या परंपरेत खंड पडू दिला नाही हे विशेष. दुर्गांच्या देशातून… चे हे नववे वर्ष आहे.
दुर्ग आणि इतिहास या विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या मंडळींचा शोध घेऊन त्यांना या दिवाळी अंकासाठी लिहायला प्रवृत्त करणे हेच मोठे आव्हानाचे काम. मात्र, असे असताना वाचकांना प्रत्येकवर्षी नव्या लेखकांचे वाचायला मिळावे म्हणून एका वर्षी ज्या लेखकाने लिहिले त्याला पुढची दहा वर्षे पुन्हा अंकात लिहायला सांगायचे नाही, असा पण करून ही मंडळी मैदानात उतरली आहेत.
अंकाविषयी सांगायचे झाले तर, दुर्गाविषयाची पूरक संदर्भांनी आणि इतिहासाच्या दाखल्यांनी या अंकाचे पान अन् पान रंगलेले आहे. जुन्या पिढीतील प्रसिद्ध ट्रेकर रवींद्र अभ्यंकर यांनी शिवराज्याभिषेकाला ३०० वर्षे पूर्ण झाली तो सोहळा कसा झाला होता आणि त्याची काय वैशिष्ट्ये होती याविषयीचा अभ्यासपूर्ण लेख लिहिलेला आहे. १०० हून अधिक किल्ले स्वत: फिरून पाहिलेल्या सचिन पाटील यांनी ‘ब्रिटिशांना भावलेला पन्हाळा’ उलगडला आहे. डॉ. नि. रा. पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील किल्ले आणि गढ्यांची अभ्यासपूर्ण माहिती लेखाद्वारे दिली आहे. गेली ३० वर्षे सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात अभ्यास करणाऱ्या सुखद राणे यांनी रायगड जिल्ह्यातील ५९ किल्ल्यांची खुमासदार शैलीत ओळख करून दिली आहे. युरोपीय दुर्गशास्त्रानुसार भारतातील पहिला किल्ला बांधणाऱ्या टीपू सुलतान आणि त्याने बांधलेल्या किल्ल्याविषयी निखिल बेल्लारीकर यांनी लिहिले आहे. श्रीपाद हिर्लेकरांचा ‘ट्रान्स द सह्याद्री’ या सोलो ट्रेकवरचा लेख आवर्जून वाचण्यासारखा झाला आहे. विविध लिपींचे जाणकार असलेल्या सदानंद कदम यांनी सांगली जिल्ह्यातील किल्ल्यांची वैशिट्ये उलगडलेली आहेत.
दुर्ग या विषयाशी प्रामाणिक राहून अशा अनेकानेक पैलूंचा बहुअंगांनी वेध घेण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. इतिहासाविषयी अभिमान, आवड आणि प्रेम असलेल्या प्रत्येक वाचकाने आणि प्रत्येक दुर्गप्रेमी आवर्जून संग्राह्य ठेवावा असा हा अंक आहे. वाचकांनी हा अंक जरुर वाचावा.
लेखन – पराग पोतदार
अंकाचे तपशील पुढीलप्रमाणे –
दिवाळी अंक : दुर्गांच्या देशातून…
संपादक – संदीप तापकीर, योगेश काळजे
संपर्क क्रमांक – ९८५०१७९४२१
मूल्य : २०० रुपये.