गोंदण – जागतिक पर्यावरण संवर्धन विशेष
कोरोनामुळे अवघ्या जगावर आलेले संकट आणि त्यातून सावरताना, पुन्हा उभं राहताना होणारी दमछाक हे सध्याचं धगधगीत वास्तव आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, निसर्गाचा आणि पर्यावरणाचा मानवाने केलेला -हास आपल्याच अस्तित्वापुढे आता प्रश्नचिन्ह बनून उभा ठाकलेला आहे. त्यामुळे पर्यावरणाचे आणि निसर्गाचे महत्त्व आपल्या जगण्यात किती आणि कसे आहे याचा विविध लेखांतून वेध घेण्याचा प्रयत्न ‘गोंदण’ – जागतिक पर्यावरण संवर्धन या दिवाळी अंकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.
अत्यंत वेगळे, बोलके आणि सूचक संदेश देणारे असे मुखपृष्ठ या दिवाळी अंकाने साकारलेले आहे. या अंकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या अंकाचे संपादक प्राचार्य पांडुरंग गाडीलकर यांच्या पुढाकाराने त्यांचे सर्व माजी विद्यार्थी मिळून दरवर्षी हा दिवाळी अंक काढतात. या वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देखील खंड पडू न देता त्यांच्या कुलस्वामिनी प्रतिष्ठानने अंकाची परंपरा जपली आहे.
या दिवाळी अंकात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी कोरोनामय सांस्कृतिक सामाजिक अनुबंध या विषयावर केलेले चिंतन वाचनीय आहे.
या खेरीज, ताडोबाच्या जंगलात (अरुण बो-हाडे), पर्यावरण आपला सखा (प्रा. रेखा फाले), खेळाचे-व्यायामाचे महत्त्व (चांगदेव पिंगळे), खरंच कुठं चुकतो आपण (प्रितम तेलंग) असे काही चांगले वाचनीय लेख यामध्ये आहेत. काव्यविभागतही विविध नवोदित आणि जाणकार कवींनी त्यांच्या प्रतिभेचा अविष्कार घडवलेला आहे.
पर्यावरण हा विषय केंद्रस्थानी ठेवून या अवघड काळात दिवाळी अंक काढण्याची परंपरा कायम राखली आणि सलग सातव्या वर्षी दिवाळी अंक प्रकाशित केला त्याबद्दल संपादक महोदयांचे, त्यांच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘शब्दसारथी’ परिवाराच्या वतीने अभिनंदन.
लेखन : पराग पोतदार
अंकाचे तपशील पुढीलप्रमाणे :
दिवाळी अंक : गोंदण
कुलस्वामिनी प्रतिष्ठान
संपादक – प्राचार्य पांडुरंग गाडीलकर
संपर्क क्रमांक – ९९६००६४०३३
स्वागतमूल्य : १६० रुपये.