आपले छंद
उत्कृष्ट निर्मितीमूल्य आणि वेगळ्या विषयाची जोड देऊन साकारलेला ‘आपले छंद’ हा दिवाळी अंक वाचनीय आणि प्रेक्षणीय असा बनलेला आहे.
यंदा एक वेगळाच विषय दिवाळी अंकासाठी निवडला आहे. तो म्हणजे, ‘बलुतेदारी कालची आणि आजची’. या एका वेगळ्या विषयाच्या माध्यमातून बलुतेदारी पद्धतीचा इतिहास उलगडतानाच, त्याचे वर्तमान, भविष्य आणि त्याच्याशी संबंधित विविध आयाम उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ग्रामीण भाषेचे वैविध्य जपून एकेक बलुतेदार आपल्यासमोर उभा करण्यात या अंकाला यश मिळाले आहे.
पारंपरिक पद्धतीने अंकाची मांडणी न करता त्यातील वेगळेपण उठून दिसते. रामदास वाकचौरे यांनी मुखपृष्ठासह आतील सजावट केलेली आहे. ‘बलुतेदार स्थिती गती बदलायला हवी’ या विषयावर डॉक्टर प्रल्हाद लुलेकर यांनी लेखन केले आहे. ‘चितळे घराघरात लवकरच देशभरात’ या विषयावर चितळेंचे चौथ्या पिढीचे साक्षीदार इंद्रनील चितळे यांची मुलाखत संपादक दिनकर शिलेदार यांनी घेतली असून त्याचे शब्दांकन पराग पोतदार यांनी केले आहे.
‘कुंभार आणि बिघडलेला इतिहास’ हा लेख रवी परांजपे यांच्या लेखणीतून उत्तम उतरला आहे आणि तो आवर्जून वाचण्यासारखा झालेला आहे. पिंपळाची पालवी व बलुत्यांच्या नोंदी हे समीर गायकवाड यांनी लिहिलेले लेख लालित्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असे आहेत. किरण सुभाष चव्हाण यांनी परीट समाजाचा भूतकाळापासून वर्तमानापर्यंतचा वेध घेतलेला आहे. अलुतेदार बलुतेदार स्त्रियांचे प्रश्न हा विषय डॉ. वंदना महाजन यांनी उत्तमरीतीने समोर आणला आहे. गावगाड्यातील कुणबी, सोनार, जोशी, सुतार यांच्यावरही विविध लेख समाविष्ट केलेले आहेत. २०० वर्षांपूर्वीची बलुतेदारी हा विंग कमांडर शशिकांत ओक यांनी संकलन केलेला लेखही संदर्भ म्हणून उपयुक्त आहे.
बलुतेदारीसंदर्भात अनेक पूरक संदर्भ सांगणारा असा एक संग्राह्य अंक साकारण्यात यश आले आहे. त्याच्या आकर्षक मांडणीमुळे आणि उत्कृष्ट छायाचित्रांमुळे पानापानांवर आपण खिळून राहतो. त्याचप्रमाणे उत्कृष्ट निर्मितीमूल्य ही या अंकाची आणखी एक उजवी बाजू आहे. गेल्या २२ वर्षांच्या दिवाळी अंकाच्या वाटचालीत थोडेथोडके नव्हे ५५ पुरस्कारांनी या दिवाळी अंकाला सन्मानित केलेले आहे. चांगल्या दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध दिवाळी अंकांनाही पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. तेव्हा वाचकांनी हा अंक जरुर वाचावा.
लेखन : पराग पोतदार
अंकाचे तपशील पुढीलप्रमाणे :
दिवाळी अंक : आपले छंद
संपादक – दिनकर शिलेदार
संपर्क क्रमांक – ९८२२०४३६९९
मूल्य : २५० रुपये.