अक्षरधारा
अचानक चैतन्य हरवलेल्या वातावरणात अक्षरधाराने अक्षरांची धारा अखंडित ठेवली आहे. त्याचबरोबर दर्जेदार अंकाची परंपराही कायम राखली आहे.
यावर्षीच्या अक्षरधारा अंकाचे मुखपृष्ठ, अंकाचा आकार आकर्षक आहे त्याचबरोबर दमदार लेखांची, कवितांची मांदियाळी आहे.
या अंकातील सानिया यांच्या ‘निवडलेल्या वाटेने जाताना…’ या लेखातून सर्जनशील लेखिका सानिया यांनी चोखाळलेली समुपदेशनाची वाट विलक्षण अनुभूती देणारी आहे. अचानक उद्भवलेल्या कोरोनामुळे वेगानं बदललेल्या जीवनशैलीची संपादक, लेखक भानू काळे, अभिनेते-दिग्दर्शक, लेखक हृषीकेश जोशी, आणि वाचक-लेखक नीतीन वैद्य यांनी त्यांच्या दृष्टीने घेतलेली काळाची नोंद सजग करणारी आहे.
भारत सासणे, गणेश मतकरी, प्रणव सखदेव, वसुंधरा काशीकर या भिन्न शैलीच्या कथाकारांच्या कथांबरोबरच अभिषेक सेनगुप्ता यांच्या बंगाली कथेचा कथेचा अनुवाद सुमती जोशी यांनी केला आहे, त्याचबरोबर मधुकर धर्मपुरीकर यांनी केलेला फणीश्वरनाथ रेणू यांच्या हिंदी कथेचा अनुवादही अंकात आहे.
ज्यांचे नाव उच्चारताक्षणी आपण ज्यांना मनोमन मुजरा करतो अशा बाबासाहेब पुरंदरे यांना प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘इतिहासपुत्र’ या लेखात आणि दिलीप प्रभावळकरांसारख्या हरहुन्नरी कलावंतातील माणूसपण यशोदा वाकणकर यांनी शब्दबद्ध केले आहे.
भारतीय संस्कृतीतील पंचकन्यांपैकी एक सीता ही ‘भूमीकन्या’ या प्रिया जामकर यांच्या लेखातून आपल्यापुढे येते. ‘अर्ली इंडियन्स’ या पुस्तकाचा परिचय चेतन कोळी यांनी करून दिला आहे.
‘सजग रेषांचा सर्जक प्रवास’ हा चित्रा राजेंद्र जोशी यांचा मुलाखतींवर आधारित लेख वाचताना रेषांचा अनोखा प्रवास आपल्याला रेषांच्या जगात घेऊन जातो. रवींद्र शोभणे यांचे ‘ती आई होती म्हणुनी’ हे हृद्य व्यक्तिचित्र अंकात आहे.
‘अपरान्त’ हा ग्रामदेवतांच्या कुळकथा सांगणारा नीती मेहेंदळे यांचा लेख आपल्याला गावोगावी जोडत नेतो आणि ‘प्राजक्त’ हा स्वाती दिवेकर यांचा लेख हळुवार हळवं करतो.
आश्लेषा महाजन, अनिल साबळे, दासू वैद्य, अंजली कुलकर्णी, प्रा. डॉ. वर्षा तोडमल, जयश्री जोशी, योजना यादव, प्रिया जामकर या मान्यवर कवींच्या कवितांचा समावेश अंकात आहे.
वाचकांच्या मनोरंजनाबरोबरच ज्ञानवर्धन करण्याची परंपरा जपणारा अक्षरधारा अंक संग्रही असावा असाच आहे.
लेखन : वैशाली मोहिते
अंकाचे तपशील पुढीलप्रमाणे
दिवाळी अंक : अक्षरधारा
प्रकाशक : रमेश राठिवडेकर
मूल्य : ₹ २२०
संपर्क क्रमांक : ०२०- २४४४१००१