अक्षरबंध
यंदाचे वर्ष निश्चितच वेगळे आहे, असे म्हणावे लागेल, कारण गेले ८ ते ९ महिने कोरोनामुळे सर्वत्र काहीशी अनिश्चितता आणि निराशजनक परिस्थिती आहे. सगळीकडे दुःख आणि काळजीचे वातावरण आहे. याच वातावरणात आपण होळी, गुढीपाडवा, अक्षयतृतीया तसेच श्रावणातील सर्व सण व्रत-वैकल्य आणि गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे अनेक सण उत्सव साजरे केले. किंबहुना घरातल्या घरातच साजरे करण्याचा प्रयत्न केला, खरे म्हणजे हे सण आले आणि गेले. पण आता कोरोनाचा प्रभाव काहीसा ओसरला आणि मग दिवाळी आली.
प्रकाशाचे दिवे पेटले आणि निराशा, उदासीनता, नकारात्मक असे काळे ढग आता विरू लागले आहेत. पुन्हा नवे चैतन्यमय दिवस येत आहेत. अक्षरबंध दिवाळी विशेषांकातून देखील चांगल्या विचारांची दरवळ पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला दिसतो. यामध्ये कथा, कविता, ललित, लेख, प्रवास वर्णन अशी नेहमीची मेजवानी तर आहेत, परंतु ही मांडणी करताना सकारात्मकतेवर भर दिलेला आहे.
या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक साहित्य प्रकाराचे शीर्षक आगळेवेगळे रेखाटले आहे. या दिवाळी अंकात ललित प्रकारात शशिकांत शिंदे, प्रशांत भरवीरकर, धनाजी बुटेरे, निशा डांगे कांचन राहणे, पुनम सांगळे आदींचे वाचनीय ललित लेख आहेत. त्याचप्रमाणे ऐश्वर्या पाटेकर, अजीतेम जोशी, सप्तर्षी माळी, पुंजाजी मालुंजकर, दिलीप पाटील आदींच्या आगळ्यावेगळ्या कथा आहेत. तसेच प्रवासवर्णन प्रकारांमध्ये शरद पुराणिक आणि सुमेधा देशपांडे यांचे प्रवास वर्णनात्मक लेख आहेत. तर लेख या प्रकारात अक्षय बर्वे, डॉ. दिनेश काळे, किरण डोंगरदिवे, विद्या देशमुख, अर्चना जोशी, भारती सावंत, प्रा. मेघना वाघ यांचे लेख आहेत, तद्वतच कविता या प्रकारात प्रा. शंकर कापडणीस, खलील मोमीन, प्रा. प्रशांत मोरे, अरुण देशपांडे, विष्णू थोरे, प्रवीण जोंधळे, हेमंत राजाराम, ज्ञानोबा ढगे, रवींद्र मालुंजकर , मुकुंद बाविस्कर, प्रशांत केंदळे, किरण भावसार, प्रा. गिरीश पाटील आदिंच्या कविता आहेत. त्याचप्रमाणे अरविंद गाडेकर यांनी रेखाटलेली व्यंगचित्र देखील आहेत.
लेखन- मुकुंद बाविस्कर
अंकाचे तपशील असे:
दिवाळी अंक – अक्षरबंध
संपादक – प्रवीण जोंधळे
संपर्क क्रमांक ९९२२९४६६२२
स्वागत मूल्य-१३० रुपये.