थिंक पॉझिटिव्ह – राग का येतो?
दरवर्षीच्या विविध दिवाळी अंकांमध्ये विशेषत्वाने उठून दिसणारा आणि मानवी भावभावनांना स्पर्श करून त्यातील अनेकानेक पैलू उलगडणारा दिवाळी अंक म्हणजे ‘थिंक पॉझिटिव्ह’. या वर्षी ‘राग’ हा विषय घेऊन वाचकांसमोर येत आहे!
माणसातील या एका महत्त्वाच्या उपजत भावनेचे विविध पैलू उलगडण्याचा एक यशस्वी प्रयत्न या अंकाद्वारे केलेला आहे.
‘राग’ या एका भावनेशी जोडलेले अनेकानेक पैलू या अंकात खुबीने उलगडलेले आहेत. अगदी स्वत:वरच्या रागापासून ते नात्यांमधला, कुटुंबातला, रस्त्यावरचा, धकाधकीच्या जगण्यातला, कामाच्या ठिकाणचा, सीमेवरचा, व्यवस्थेच्या विरोधातला, लहान मुलांमधला राग असे अनेक प्रकारचे राग आणि त्यांचे व्यवस्थापन याविषयीचे मार्गदर्शन दिलेले आहे. चित्रपटांतून दिसणारा राग आणि समाजमाध्यमांतून व्यक्त होणारा राग याविषयावरही अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट केलेले आहेत. त्या शिवाय, रागाचे आहाराशी असणारे नाते, रागाचे व्यवस्थापन करण्याच्या पद्धती, ध्यानाचे व योगाचे महत्त्व अशा विविध उपाययोजनांद्वारे राग योग्य पद्धतीने कसा हाताळायचा याविषयी जाणकार अभ्यासकांनी व मानसोपचार तज्ज्ञांनी मार्गदर्शनही केलेले आहे.
दिवाळी अंकासाठी असे ‘हटके’ विषय निवडण्याची परंपरा ‘थिंक पॉझिटिव्ह’ने याहीवर्षी कायम राखली आहे. गेल्या वर्षी ‘ताण’ हा विषय घेऊन तर त्यापूर्वी ‘एकटेपणा’ हा विषय घेऊन दिवाळी अंक प्रसिद्ध केले. त्यांना वाचकांचा अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता.
रागाबद्दल काही सांगू पाहणाऱ्या या दिवाळी अंकामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी व अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांची विशेष मुलाखत वाचायला मिळेल. तसेच विविध क्षेत्रातील कलावंत रागाकडे कसे पाहतात आणि रागाचे विरेचन कसे करतात हे वाचायला मिळू शकेल. ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, ज्येष्ठ नृत्यांगना मनिषा साठे, प्रख्यात गायक आनंद देशमुख व कवयित्री संगीता बर्वे यांच्याशी संवाद साधलेला आहे. याशिवाय राजीव तांबे, रेणू दांडेकर, निलांबरी जोशी, स्मिता जोशी, दीपा देशमुख, डॉ. संप्रसाद विनोद, अरुण खोरे, ऋता बावडेकर, मुक्ता चैतन्य, सैय्यदभाई, अमोल उद्गीरकर, मुक्ता पुणतांबेकर अशा अनेकानेक मान्यवर आणि नामांकीत लेखकांच्या लेखनाने हा अंक सजलेला आहे.
अंकाच्या पानापानांतील मजकूर वाचनीय आहे आणि रागाचा एक वेगळा पैलू उलगडून दाखवणारा आहे. अंकाचे मुखपृष्ठ आणि आतील मांडणी अंकाचे संपादक प्रभाकर भोसले यांनी स्वत: केली आहे. सहसंपादक म्हणून अभिजीत सोनावणे व पराग पोतदार यांनी योगदान दिले आहे. अतिथी संपादक म्हणून श्री. यमाजी मालकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गेल्या पाच वर्षांत १४ हून अधिक पुरस्कारप्राप्त करणारा हा ‘थिंक पॉझिटिव्ह’चा अंक याही वर्षी त्याच दर्जेदार स्वरूपात निघतो आहे आणि वाचकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालेला आहे.
आपल्याला सगळ्यांनाच राग येतो. अनेकदा रागाच्या अतिरेकाने नुकसानही होतं. परंतु रागाकडे पाहायला हवं तसं कधी आपण पाहतच नाही. राग प्रेरकही ठरू शकतो आणि संहारकही. याचीच सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न या अंकातून केलेला असल्याने प्रत्येकाने हा दिवाळी अंक नक्की वाचायला हवा.
लेखन : पराग पोतदार
अंकाचे तपशील पुढीलप्रमाणे :
दिवाळी अंक : थिंक पॉझिटिव्ह : राग का येतो?
संपादक – प्रभाकर भोसले
संपर्क क्रमांक – ९८८१०९८०१०
मूल्य : २०० रुपये.