नवी दिल्ली – भारतापेक्षा कमी दर असल्यानं सीमाभागातले लोक शेजारच्या देशात म्हणजेच नेपाळमध्ये पेट्रोल खरेदीसाठी जात आहेत. बिहारच्या अररिया आणि किशनगंज जिल्ह्याच्या सीमेलगतच्या पायवाटांमधून पेट्रोलची तस्करी करताना काही जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस आणि सीमा सुरक्षा दलाचे जवानांच्या नजरेआडून हे लोक इंधनाची तस्करी करत होते. दरम्यान, इंधनाची तस्करी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आल्याचं सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी एस. के. सारंगी यांनी सांगितलं.
स्वस्त इंधन पुरवठा
कोरोना संसर्गामुळे लावलेल्या प्रतिबंधांमधून अद्याप सवलत दिली गेली नाही. त्यामुळे नेपाळची सीमा पूर्णपणे उघडलेली नाही. नेपाळमधील पेट्रोलचे दर भारतातील पेट्रोलच्या दरापेक्षा २२ रुपयांनी कमी आहेत. विशेष म्हणजे नेपाळला स्वस्त इंधनाचा पुरवठा भारतातूनच केला जातो. जुन्या करारानुसार इंडियन ऑइल कॉर्पोरेशन नेपाळसाठी अरब देशातून इंधन मागवतं आणि खरेदीच्या दरातच नेपाळला ते पुरवतं. नेपाळकडून फक्त तेल शुद्धीकरणाचं शुल्क घेतलं जातं.
पायवाटांद्वारे तस्करी
भारत-नेपाळची जोगबनी (बिहार) सीमा नेहमीच सतर्क असते. परंतु सीमा भागातल्या ३० हून अधिक अशा जागा आहेत ज्यातून तुम्ही पायवाटांद्वारे आरामात ये जा करू शकतात. नेपाळमधून तस्करी होत असल्यानं इंधनविक्रीवर विपरित परिणाम झाला आहे, असं स्थानिक पेट्रोलपंपाचे मालक सुधीर कुमार यांनी सांगितलं. अररिया, फासबिसगंज, नरपतगंजमध्ये जितके पेट्रोलपंप आहेत, त्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. तेलाची तस्करी करून ते मोठ्या प्रमाणात भारतातील छोट्या दुकानदारांना कमी किमतीत उपलब्ध करून दिलं जात आहे.
वाहनांच्या टाक्यांमधून तस्करी
उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर, लखीमपूर खिरी आणि पिलभीत इथून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातून नेपाळमध्ये जाणारे वाहनांचे मालक तिथून टँक भरून वापस येतात. स्थानिक लोक छोटे वाहनं, दुचाकीद्वारे नेपाळमधून पेट्रोलच्या टाक्या भरून परत येत आहेत.