स्वस्त पुस्तके देणाऱ्या प्रकाशन संस्था
दिनांक १५ ऑक्टोबर हा दिवस राज्यात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. शाळा आणि
महाविद्यालयांमध्ये या दिवशी वाचन संस्कार रुजवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यानिमित्ताने
अल्प किंमतीमध्ये दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशन संस्थांचा परिचय करुन देणारा लेख.
पुस्तकं नसलेलं घर आणि पक्षी नसलेलं झाड सारखंच असतं असं म्हटलं गेलं आहे. पुस्तकांमुळे घराला
घरपण मिळतं. दगड विटांच्या भिंतींपेक्षा आणि लाकडी फर्नीचरपेक्षा पुस्तकांनी घराला लाभणारं वैभव
शब्दात बांधता न येणारं आहे. पुस्तकांमुळे घराच्या भिंती पारदर्शक होतात, आपल्याला भिंतीबाहेरचं विश्व
कळून येतं ते पुस्तकांमुळेच. त्यामुळं पुस्तकांचं मोल, अनमोल आहे.
पुस्तकांच्या वाढत्या किंमती खुप वेळा वाचकाला पुस्तक खरेदीपासून परावृत्त करतात. त्यामुळे अगदी
अत्यल्प किंमतीमध्ये पुस्तके प्रकाशित करणार्या संस्थांचे दुहेरी मोल आहे. एक तर त्या कमीत कमी
पैशात जास्तीत जास्त पुस्तके वाचकाला देतात आणि जागतीक पातळीवर गौरवली गेलेली अतिशय
दर्जेदार पुस्तके अनुवादाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात.
साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, विश्वकोश मंडळ, साहित्य संस्कृती मंडळ, राज्य पाठ्यपुस्तक
निर्मिती मंडळ, एकलव्य, प्रथम बुक्स, भारत ज्ञान विज्ञान समुदाय आणि चैतन्य सृजन व सेवा संस्था
या प्रकाशन संस्थांची पुस्तके अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध असतात. छपाई खर्चाच्या किंमतीमध्ये
यातील बहूतेक संस्था वाचकांपर्यंत पुस्तकं पोहचवतात.
साहित्य अकादमी ही देशातील सर्वोच्च साहित्य संस्था आहे. बावीस भाषांमध्ये पुस्तकांचे प्रकाशन करणारी
ही जगातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था आहे. मराठी भाषेमध्ये साहित्य अकादमीने अनेक उत्तमोत्तम ग्रंथ
प्रकाशित केले आहेत. छोट्या मुलांसाठी आणि कुमार गटासाठी त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तके आपण
नजरेखालून घातली पाहिजेत. अंतराळातील स्फोट (जयंत नारळीकर), अजबग्रहाची दंतकथा (ताजिमा शिंजी), बालसाहित्य (रविंद्रनाथ टागोर), मौखिक परंपरेतील बालगीते (मधूकर वाकोडे), भुलवणाऱ्या गोष्टी
(विभुतिभुषण बंधोपाध्याय) ही अकादमीची पुस्तके आपल्या संग्रही असलीच पाहिजेत. तिस रुपयांपासून ही
पुस्तके उपलब्ध आहेत.
पुस्तके आणि वाचनाची आवड समाजामध्ये रुजावी यासाठी भारत सरकारने १९५७ साली नॅशनल बुक ट्रस्ट
या संस्थेची उभारणी केली. मुलांसाठी ‘नेहरु बाल पुस्तक माला’ ट्रस्टने सुरु केली आहे. राष्ट्रीय एकात्मता
रुजवण्यासाठी या मालेचा मोठा उपयोग झाला आहे. इतिहास, लोककथा, सण, राष्ट्रीय चळवळ, विज्ञान,
वन्य प्राणी, वनस्पती, खेळ, चित्रशैली या विषयांवरती या मालिकेतील पुस्तकांची व्याप्ती आहे. तेत्सुको
कुरोयानागी यांचे ‘तोत्तोचान’ हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट यांनीच प्रकाशित केलेले आहे. मारुती
चित्तमपल्ली, भा. रा. भागवत, राहूल कोसंबी, अनंत भावे, यदूनाथ थत्ते, अशोक जैन, चेतना सरदेशमुख
अशा मान्यवरांनी जगभरातील श्रेष्ठ साहित्य मराठी वाचकांसाठी अनुवादीत केले आहे. अत्यल्प किंमतीमध्ये ही पुस्तके उपलब्ध आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश मंडळाने बाल कुमारांसाठी विश्वकोश निर्मिती सूरु केली आहे, विश्वकोश हा
जतन करुन ठेवावा असा ‘ठेवा’ असतो. प्रकाशित झालेले ‘कुमार विश्वकोशा’चे खंड खुपच कमी
किंमतीमध्ये उपलब्ध आहेत. साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम
संशोधन मंडळ यांची ग्रंथसंपदाही अल्प किंमतीत उपलब्ध होते. मंडळाने प्रकाशित केलेल्या संस्कारक्षम
कथा, स्वातंत्र्य संग्राम गिते, शिक्षकांची आत्मचरीत्रे वाचनीय आहेत.
‘एकलव्य’ ही भोपाळ येथील स्वयंसेवी संस्था आहे. ‘एकलव्य’ने मराठीतही अनेक पुस्तके प्रकाशित केली
आहेत. पुस्तकासाठी वापरलेल्या कागदाचा प्रकार, कागदाची जाडी, बांधणीचा प्रकार, लॅमीनेशनचा प्रकार,
अक्षरांची जाडी या सगळ्यांविषयीची माहिती एकलव्यच्या प्रत्येक पुस्तकात छापलेली असते. त्यामुळे
वाचकाला पुस्तकासंदर्भातील अनेक गोष्टींचे सहज ज्ञान होते. ‘ऊ टू ची गोष्ट’, ‘बी लावलं’, ‘रुसी आणि
पुसी’, ‘मी पण’, ‘उंदराला सापडली पेंसील’, ‘नाव चालली रे’ अशी काही पुस्तके एकलव्य ने प्रकाशित केली
आहेत.
‘प्रथम बुक्स’ ही निर्मिती खर्चात पुस्तक देणारी प्रकाशन संस्था. ई बूक स्वरुपातही प्रथमची पुस्तके
उपलब्ध आहेत. मुलांमध्ये वाचनाची आवड रुजावी यासाठी मराठीसोबत अनेक भारतिय भाषांमध्ये प्रथम
बुक्स पुस्तके प्रकाशित करते. भारत ज्ञान विज्ञान समुदाय ही साक्षरतेसाठी काम करणारी संस्था आहे. ‘जनवाचन आंदोलन’ या उपक्रमातून त्यांनी शेकडो पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या किंमतीही अगदीच नगण्य आहेत.
द्वैभाषिक आणि त्रैभाषिक पुस्तकांचे प्रयोगही या समुदायाने केले आहेत.
चैतन्य सृजन व सेवा संस्था ही कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या तालूक्याच्या गावी असणारी
उपक्रमशिल संस्था आहे. या संस्थेने उभ्या केलेल्या मासिक ऋग्वेद रिलीफ फंड मधून दहा रुपये मूल्य
असणारी भरपूर पुस्तके प्रकाशित केली आहेत. वाडी तांड्यावरील मुलांना खाऊच्या पैशात पुस्तके मिळावित
ही ‘चैतन्य’ सेवा संस्थेची धडपड आहे. सहज सोपे मराठी व्याकरण (पी जे कांबळे), ढग रंगीत झाले
(माधुरी माटे), एक होता पक्षीमित्र प्राणीसखा (राजा शिरगुप्पे), राया (सुभाष विभुते), जपानहून आणलेल्या
छोट्यांच्या मोठ्या गोष्टी (पृथ्वीराज तौर) मित्र (फारुख काझी) अशी मोठी मोठी पुस्तके केवळ दहा
रुपयांमध्ये रिलीफ फंड मधून उपलब्ध करुन दिली आहेत. महागाईच्या काळात स्वस्त पुस्तके देणाऱ्या या प्रकाशन संस्था म्हणजे प्रकाशाची देदीप्यमान बेटेच होत.
(संपर्क क्रमांक- ९४०५५४७००२)