नवी दिल्ली – सण उत्सवाचे दिवस जवळ येताच सोन्याचे भाव तेजीत असतात. परंतु, मोदी सरकारतर्फे सर्वसामान्यांसाठी अत्यंत स्वस्त दरात सोन्याची खरेदी करण्यासाठी खास योजना राबवण्यात येत आहे. सार्वभौम गोल्ड बाँड अंतर्गत या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वभौम गोल्ड बाँड योजनेची सातवी मालिका, २०२०-२१ सुरु झाली आहे. याअंतर्गत १२ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत योजनेत गुंतवणूक करून संपूर्ण लाभ घेता येणार आहे. जरी या योजनेतून भौतिक स्वरूपात सोने मिळाले नाही, तरीही सोन्याइतकीच किंमत नक्कीच मिळेल असे आश्वासन योजनेअंतर्गत देण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सॉवरेन गोल्ड बाँडची अंमलबजावणी केली असून सातव्या मालिकेअंतर्गत आता प्रति ग्रॅम सोन्याची किंमत ५०५१ रुपये निश्चित करण्यात आली आहे. १२ ऑक्टोबरपासून योजना खुली करण्यात आली आहे. गुंतवणूकदारास वार्षिक व्याज २ टक्के मिळते. योजनेचा कालावधी कालावधी ८ वर्षे आहे. तसेच सार्वभौम गोल्ड बाँड योजना २०२०-२१ ची आठवी मालिका ९ ते १३ नोव्हेंबर दरम्यान उघडली जाणार आहे.
—
असा मिळवा लाभ…
योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास या बाँडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड किंवा पासपोर्ट असणे आवश्यक आहे. पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसएचसीआयएल), नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई), बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) किंवा थेट एजंट्सद्वारे करता येणार आहे. या योजनेअंतर्गत कर्ज देखील घेता येणार आहे.