मुंबई – फॅशन डिझायनर सायशा शिंदे हिला आतापर्यंत स्वप्निल शिंदे या नावाने ओळखले जात होते. ती स्वतःला समलैंगिक पुरुष समजायची मात्र सहा वर्षांपूर्वी आपण तृतियपंथी असल्याची तिला जाणीव झाली आणि हे सत्य जगापुढे आणण्याचा तिने निर्णय घेतला.
सायशाने इन्स्टाग्रामवर हा खुलासा करीत लिहीले आहे की लहानपणापासून इतर मुलांपेक्षा आपण वेगळे आहोत, यासाठी चिडवले जायचे. त्यामुळे आपण दुःखी व्हायचो. सतत दडपणात जगायची तिला सवय झाली. एकटे राहायची सवय झाली. समाजात राहायचे म्हणून एक बनावट आयुष्य ती जगत होती. पण मनातून ती खजील झालेली होती. मात्र ज्यावेळी मोठे झाल्यावर नॅशनल इन्स्टिट्यूट आफ फॅशन टेक्नॉलॉजीला प्रवेश घेतला त्यावेळी तिथे सत्य स्वीकारण्याची हिंमत मिळाल्याचे ती म्हणते. त्यानंतर समलैंगिक स्त्री असल्याची जाणीव झाल्यानंतर हे सत्य जगापुढे आणण्याचा निर्णय तिने घेतला. त्यात मोठा संघर्ष तिला करावा लागला. परंतु, कुटुंबाने तिची साथ दिली.
दीपिका पादुकोण, करिना कपूर, अनुष्का शर्मा, माधुरी दीक्षित यांच्यासारख्या दिग्गज नट्यांसाठी कपडे डिझाईन करणारा स्वप्नील आता सायशा म्हणून ओळखला जात आहे. दाढी-मिशी आणि स्पाईक हेअरस्टाईल असलेल्या एका तरुणाच्या जागी आता सुंदर महिला असलेले एक छायाचित्र तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. या छायाचित्राबाबत तर तिने सविस्तर लिहीलेले नाही, पण असे रुप धारण करण्याचा आपण प्रयत्न करीत असल्याचे तिने म्हटले आहे. अनेकांनी तिच्या या निर्णयाचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री हिना खान यांच्यातीलच एक आहे. आत्मविश्वास आणि शक्तीच्या जोरावर सायशा असे करू शकली, असे हिनाने म्हटले आहे.