नाशिक – आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थीनी शॉर्टकटचा अवलंब करू नये. संदर्भ म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग जरुर करावा. शिक्षकांच्या मार्गदर्शनाला स्वतःचे प्रयत्न जोडून अभ्यास करणे आवश्यक आहे. कोणाचीही कॉपी करु नका, स्वतःच्या प्रयत्नाने आपली कौशल्ये विकसित करा आणि स्वत: अनुभव घेत ज्ञान मिळवा. भविष्यातील आत्मनिर्भर भारत तुमच्या हातूनच घडणार आहे, अशा प्रेरणादायक विचारांनी लेफ्टनंट कर्नल पी एस कृष्णा यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. केंद्रीय विद्यालय, तोफखाना केंद्र, नाशिकरोड कॅम्प मध्ये आयोजित ७४ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
कृष्णा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महात्मा गांधी, प्रख्यात वैज्ञानिक एडिसन इत्यादींचे रोचक प्रसंग त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यदिनची थीम लाईन आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर सुंदर विवेचन केले. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या महत्वावर ही चर्चा केली. कोविड -१९ संक्रमण प्रभावामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले गेले नाही, ऑनलाइन वर्गांमधूनच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य समारंभ अनुभवता आला. शिक्षकांच्या समूहाने “ये है नया हिंदुस्तान” या गाण्याचे सुंदर सादरीकरण केले. प्राचार्य देवेंद्रकुमार ओलावत यांनी अतिथींचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, कोरोना साथीच्या काळातही केंद्रीय विद्यालय आपल्या विद्यार्थ्यांना सोप्या व सहज पद्धतीने ऑनलाईन शिक्षण देत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रक्रियेत कोणताही खंड पडणार नाही, याची काळजी घेत आहे.
सूत्रसंचालन शिक्षक आरिफ बेग यांनी केले तर उपप्राचार्या अंजू कृष्णानी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महादेव बारब्दे, महेंद्र महाजन, राजेंद्र त्रिवेदी, रोहित गौड, जी.क्यू. उस्मानी, अमृत बागुल, अलका बंड, सोज्ज्वल मांडवगणे, नंदिनी भगत, निमिषा सिंग, मोनिका, पूजा दहिया, गीता, खुशनुमा, विजय पाटील, संतोष खडगीर, प्रवीण शिंदे, जितेंद्र सिंह, संदीप कुमार, अथर्व कडभाणे आदींनी परिश्रम घेतले.