नाशिक – राष्ट्रव्यापी स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकने ११वे स्थान प्राप्त केले आहे. ४ हजार ७२९ गुण मिळाले आहेत. अपेक्षेप्रमाणे मध्यप्रदेशातील इंदूर पहिल्या स्थानी आहे. तर, पहिल्या २० शहरांमध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई (३), नाशिक (११), ठाणे (१४), पुणे (१५) आणि नागपूर (१८) यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी शहरांसाठी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करीत असते. यंदा पाचव्या राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक हे अभियानही नाशिकमध्ये सुरू आहे. तर, घरोघरी कचरा संकलन करणारा घंटागाडीचा पथदर्शी प्रकल्पही नाशिकनेच सुरू केला होता. केंद्रीय पथकाचे सर्वेक्षण, नागरिकांना नोंदवलेला अभिप्राय याच्या जोरावर स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नाशिक चमकदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती पण पहिल्या दहा मध्ये नाशिकला स्थान प्राप्त करता आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्वेक्षणाचा निकाल आज (२० ऑगस्ट) दिल्लीत जाहीर केला. केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यावेळी उपस्थित होेते.
देवळाली कॅन्टॉन्मेंटचे यश
देशातील एकूण ८ स्वच्छ कॅन्टॉन्मेंट बोर्डांना आज पुरस्कार देण्यात आला यात महाराष्ट्रातून देहूरोड कॅन्टॉन्मेंटने पहिला क्रमांक पटकाविला आहे. ६ कॅन्टॉन्मेंट बोर्डांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार विभागून मिळाला आहे. देशातील एकूण ६२ कॅन्टॉन्मेंट बोर्डना स्वच्छता रँकींग देण्यात आली असून महाराष्ट्रातील ६ कँटॉनमेंट बोर्डचा यात समावेश आहे. यात देहूरोड
कँट(८), अहमदनगर (१२), खडकी (१५), पुणे(२५), औरंगाबाद(२९) आणि देवळाली (५२) असा क्रम आहे.