निरामय आनंद देणारी मोहिनीरुपी कला म्हणजे संगीत. अनेक गायकांनी सुरेल गीतांचा नजराणा बहाल करून आपल्याला समृध्द केले आहे. त्यापैकीच एक रत्न म्हणजे माणिक वर्मा. जन्मतः सोज्वळ सूर घेऊन आलेल्या माणिकताईंचा १० नोव्हेंबर हा स्मृतिदिन. अत्यंत श्रवणीय गीते देणाऱ्या माणिकबाईंचा आवाज हा केवळ त्यांचाच आवाज आहे. इतर चार चौघी स्त्रियांसारखा तो आवाज नाही. अत्यंत आकर्षक, श्रवणीय बसकटपणा हा लक्ष वेधून घेणारा गुण त्यांच्या आवाजात जाणवतो.
१६ मे १९२६ रोजी पुण्यनगरीत माणिकबाईंचा जन्म दादरकर कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव हिराबाई. त्यांनी स्वतःच गाण्याचा अभ्यास केलेला होता. त्यामुळे माणिकबाईंना त्यांनी लहानपणापासून स्वरसानिध्यात ठेवले. शालेय जीवन सुरू असतांनाच माणिकला संगीत शिक्षण मिळावे म्हणून आप्पासाहेब भोपे यांच्याकडे त्या पाठवू लागल्या. गायन शिकत असताना एकदा एक मैफिल होती. त्यात आप्पासाहेबांनी माणिकला गाणं म्हण, असं सांगताच अत्यंत सहजतेतून ‘गमते सदा’ हे गाणं त्या गायल्या. समोर प्रत्यक्ष बालगंधर्व होते. वय लहान असल्याने समोर कोण बसले आहे हेही त्यांना माहीत नव्हते. गाणं संपताच बालगंधर्वांनी या लहानग्या मुलीचे कौतुक केले आणि बक्षीस म्हणून चांदीचा बिल्ला दिला. घरी जाईपर्यंत या घटनेचे महत्व माणिकच्या लक्षात आले नव्हते. आईला बिल्ला देत घडलेली हकिकत सांगितली, तेव्हा आई म्हणाली, “वेडाबाई, हा बिल्ला केवळ बिल्ला नाही. अगं बालगंधर्वांनी तुला दिलेला आशीर्वाद आहे. तुझं कौतुक केलं त्यांनी. तू खरंच भाग्यवान आहेस !”.
हाच आशीर्वाद घेऊन त्यांची वाटचाल सुरू झाली. घरातच आई अभिजात संगीताची तालीम माणिकला देत होत्या. तरीही बाकी घराण्यांचा अभ्यास व्हावा, गायनात वैविध्य यावे यासाठी त्या पंडित सुरेशबाबू माने यांच्याकडे धडे घेवू लागल्या. उत्तम शिष्येला उत्तम गुरू मिळाल्याने माणिकबाईंची प्रतिभा बहरू लागली. याच वेळी ‘प्रभात’ने एक स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत १२ वर्षांच्या या चिमुरडीने हिरव्या धारवाडी खणाचे परकर पोलके घातले होते. अत्यंत धीटपणाने पालथी मांडी घालून मूळ शांता आपटे यांचे ‘वंदित राधा बाला’ हे गीत सुरेल आवाजात सादर करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. यानंतर दोन वर्षांनी म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षी संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या स्वरनियोजनात एचएमव्हीने त्यांची दोन गाणी ध्वनिमुद्रीत केली. या गाण्याच्या रेकॉर्डिंगला तेथे गजाननराव वाटवे उपस्थित होते. त्यांनाही माणिकबाईंच्या आवाजातील निरागस गोडव्याने गाणी करावीशी वाटली. त्यांनी ‘उठ राजसा व आभाळीचा चांद’ या दोन रचना माणिकबाईंकडून गावून घेतल्या. या दोन्ही गाण्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली.
माणिकबाईंचा स्वभाव अतिशय निर्मळ होता. वागण्यात सात्विकता होती. बालपणापासूनच घरात संगीताचे वातावरण असल्याने सतत सूर कानावर पडत होते. वयाच्या तेराव्या वर्षी माध्यमिक शाळेत शिकत असताना उंबऱ्या गणपतीसमोर त्यांचा गाण्याचा पहिला कार्यक्रम झाला. गाणं आणि अभ्यास दोन्ही सुरू होतं. १९४६ साली तत्वज्ञान विषय घेऊन त्या बीए झाल्या. त्या काळी मनोरंजनाची साधने फारशी उपलब्ध नसल्याने गायनाच्या मैफिलीला श्रोते भरभरून दाद द्यायचे. मा. कृष्णराव, सवाई गंधर्व, बालगंधर्व या श्रेष्ठ गायकांच्या गायनाने महाराष्ट्रातील रसिक न्हाऊन निघाले होते. प्रत्येक आठवड्याला होणाऱ्या मैफीलला एक चुणचुणीत मुलगी माना डोलवत असायची. ती होती माणिक दादरकर. १९४६ साली सुधीर फडके प्रभात कंपनीच्या हिंदी चित्रपटाचे संगीत करत होते. त्यांना ‘आया गोकुळमे छोटासा राजा’ या गाण्यासाठी वेगळा आवाज हवा होता. तो आवाज माणिकबाईंच्या आवाजात त्यांना गवसला. गाणं रेकॉर्ड झाल्यावर ते गाणे ऐकून माणिक दादरकर या पार्श्वगायिकेच नाव सर्वतोमुखी झालं. मग बाबूजींनी ग.दि.मांना आग्रह करून दोन गीतं माणिकबाईंसाठी मागून घेतली. ती होती ‘गोकुळीचा राजा माझा…’ आणि ‘सावळाच रंग तुझा…’ एच.एम.व्ही.ने ही गाणी रेकॉर्ड केली आणि या गाण्याच्या खपाचं रेकॉर्ड ब्रेक केलं. रेडिओमार्फत माणिक दादरकर हे नाव घराघरात पोहोचलं होतं. एकाहून एक गाणी माणिकबाईंकडे येऊ लागली. याच वेळी ज्येष्ठ संगीतकार बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेला ‘अमृताहूनी गोड नाम है तुझे देवा…’ हा अभंग लोकप्रियतेच्या सीमारेषा ओलांडून रसिकांच्या मनात स्थापित झाला होता. गायनातले सर्व प्रकार समर्थपणे त्यांनी सादर केले. त्यात चित्रपटातील गायनपण महत्त्वाचा भाग आहे. सीता स्वयंवर, पु लं.च्या ‘देव पावला’ या चित्रपटात ‘कौसल्येचा राम’ हे गीत यासह ‘वंदे मातरम्’, ‘गुळाचा गणपती’, ‘जीवाचा सखा’, ‘पुढचं पाऊल’, ‘मोठी माणसं’ अशी चित्रपटात कितीतरी गाणी त्यांच्या नावावर आहेत. कोणत्याही स्त्रीला आयुष्यात लग्नानंतर कलाटणी मिळते. यात सुयोग्य जोडीदार मिळाला तर असलेली कला विकसित होते. माणिकबाईंच्या आयुष्यात त्यांना समजून घेणारा, त्यांच्या कलेला प्रोत्साहन देणारा असा जीवनसाथी अमर वर्मा यांच्या रूपात मिळाला. वर्मा हेसुद्धा चित्रपट संवाद व गाणी लिहिण्याचे काम करत. चित्रपट संस्थेतच त्यांचे सुर जुळले आणि लग्नगाठ पक्की झाली. वर्मा हे मूळचे अलाहाबादजवळील फुलपूर गावचे. सासरी पण पोषक वातावरण मिळाल्याने संगीत शिक्षण सुरू होते. अनेक मैफिल त्यांनी नंतरही गाजवल्या. गायनाचा रियाज, मुलींचे संगोपन, त्यांचे हट्ट, लाड, या सर्व गोष्टी व संसारातील जबाबदाऱ्या माणिक बाईंनी व्यवस्थित सांभाळल्या. त्याच बरोबर गायन, रियाज, मैफिल, रेकॉर्डिंग यांचा ताळमेळ त्या बसवत असत. हे सगळ म्हणजे खरं तर कसरतच होती. पण त्या समर्थपणाने संगीत प्रवास सुरू ठेवत होत्या. यशवंत देव, वसंत देसाई, राम कदम, वसंत पवार, दशरथ पुजारी, सुधीर फडके अशा संगीतकारांची गाणी त्यांनी गाऊन हा ठेवा आपल्याला बहाल केलेला आहे. त्यांनी गायलेल्या व मधुकर गोळवलकर यांनी स्वरबद्ध केलेल्या गझला त्या चित्तचोरट्याला आणि सांगू कशी ग मनाची व्यथा यातून माणिक ताईंच्या आवाजातील आर्जव दिसते.
गीतकाराला जे भाव त्या गीतातून व्यक्त करायचे आहे त्या भावाला त्या पूर्ण न्याय देत. माणिक बाईं बद्दल एक आठवण मन हेलावून टाकणारी आहे. आपल्या आवडत्या भाईंनी बालगंधर्व रंगमंदिरात चतुरंग रंगसंगीत नावाचा एक अत्यंत देखणा कार्यक्रम आयोजित केला होता. नाट्यसंगीतातील मान्यताप्राप्त किर्लोस्कर, बालगंधर्व, केशवराव भोसले, आणि दीनानाथ मंगेशकर हे चार रंग होते सूत्रसंचालन पुल करणार होते. आणि गायनासाठी भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, सुधीर फडके, ज्योत्स्ना भोळे, हिराबाई बडोदेकर अशी संगीत क्षेत्रातील कलावंत मंडळी होती. पुलंनी माणिक बाईंना पण गाण्यासाठी आमंत्रित केलं होत. त्यांनी बलसागर तुम्ही वीर शिरोमणी आणि नाही मी बोलत नाथा ही सौभद्र आणि मानापमान मधील पदे गायली. ती रात्र माणिकबाईंच्या गाण्यासाठी असावी अशाप्रकारे त्यांनी गायनाची उंची गाठली. त्याचे स्वर कानावर पडताच संपूर्ण सभागृह शांत झाल. सुरांचा लगाव थेट रसिकांच्या मनाचा ठाव घेत होत. केवळ त्या पदांसाठीच माणिक बाईंचा जन्म झाला की काय असा भास होत होता. माणिक! तुझ्या पाठीवर थाप द्यायला बालगंधर्व च हवे होते.. निवेदक म्हणून उभ्या असलेल्या पू. लं. ना हे वाक्य उच्चारताना दोन वेळा आवंढा गिळावा लागला होता. एवढा त्यांचा गळा दाटून आला होता. बालगंधर्व यांना जावून तीन वर्ष झाली होती. माणिक ताई सांगत असत बलसागर पद गाताना त्या रात्री मलाही काहीतरी निराळच वाटल. समोर बालगंधर्व उभे राहून पुढच्या जागा दाखवत होते. ठरवून काही घडत नव्हते तर एकामागून एक जागा येत गेली. समोर बालगंधर्व दिसत होते. संतांना त्यांचं श्रद्धास्थान विठू माऊलीत आहे असं का वाटतं होतं ते अशा वेळी ध्यानात येतं.
गायनाचे सर्वच प्रकार उत्तम गाणाऱ्या माणिक बाई आपल्या यशात माहेरी असताना त्यांची मावशी रहात असे तिचे आणि सासरी त्यांच्या पतीची बहीण जिला माणिक बाई दीदी म्हणत त्यांचे ऋण व्यक्त करत. त्यांना त्यांची ही दीदी स्वयंपाक करण्यापेक्षा तू रियाझ करत बैस असा आग्रह करीत असे. असे अनुकूल वातावरण मिळाल्याने त्या आपल्याला अनेक गाणी देऊ शकल्या. अशा महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका माणिक वर्मा यांचा कलेचा वारसा वंदना गुप्ते, भारती आचरेकर, राणी वर्मा, अरुणा जयप्रकाश या कन्या समर्थपणे सांभाळत आहे. अभिनय, गायन अशा विविध क्षेत्रात मोठे योगदान देत आहे. अशा थोर गायिकेला भारत सरकार कडून पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या नावाने अनेक संस्था जसे पुणे भारत गायन समाज, स्वरानंद प्रतिष्ठान, अ.भा. मराठी नाटय परिषदेची पुणे शाखा विविध पुरस्कार प्रदान करतात.२००२ साली संगीतकार नौशाद यांनाही माणिक वर्मा नावाने सन्मानित केले होते. अमृतासमान आवाज असणाऱ्या माणिक बाईंची त्या चित्त चोरट्याला, घननिळा, अमृताहूनी गोड नाम तुझे देवा अशी गाणी मैफिलीत गायली जातात. पुढेही गायली जातील. त्यांच्या सुरातून त्या नेहमी अमरच रहाणार आहे.