उठी उठी गोपाळा ही भूपाळी असो किंवा ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी हे पं. कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या आवाजातील गीत असो कुमार गंधर्व यांचा चिरतरुण, सदाबहार स्वर नेहमीच आपल्याला भुरळ घालतो. आज १२ जानेवारी रोजी कुमार गंधर्व त्यांचा स्मृतीदिन…
…..
पं. कुमार गंधर्व यांचे नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. मुळात केरळ मधे असणारे हे कुटुंब कर्नाटकात आले. बेळगाव पासून दहा बारा मैलांवर सुलेभानी नावाचे गाव आहे. खेडेगाव हीच गावाची ओळख. या गावात एक मठ होता. त्याला कोमकली मठ म्हणत. या मठाचे प्रमुख म्हणून कुमारांचे वडील सिद्धरामय्या काम पहात. ते व त्यांची मुले कुमार सोडून गाण्याचे शौकीन होते. वयाच्या सहा सात वर्षे पर्यंत संगीताच्या वातावरणा पासून अलिप्त असणाऱ्या कुमारांनी एकदा स्वतः चा कंठ उघडला त्यावेळी घरातील इतर सर्वांचे गायन बंद झाले. या छोट्या शिवपुत्राच्या मुखातून विशुद्ध शास्त्रीय संगीताचा वाहता झराच वाहत होता. एकदा आदरणीय श्री.गुरुमठकल स्वामींच्या समोर या छोट्या शिवपुत्राचे गायन झाले. ते पूर्णतः रंगून गेले. त्यांच्या मुखातून सहज उद्गार बाहेर पडले. अरे, हा तर गंधर्वांचा अवतारच पृथ्वीतलावर आलेला आहे. हा कुमार गंधर्व आहे. हाच कुमार पुढे कुमार गंधर्व नावाने परिचित झाला.
लेखिका – विशाखा देशमुख, जळगाव
उपजत दैवी देणगी घेऊन आलेले कुमार सवाई गंधर्व यासारख्या श्रेष्ठ कलावंतांची गायकी आपल्या गळ्यातून, विचारातून नेमके पणाने मांडत. हुबेहूब गायन करत असल्याने त्यांना विचारल्यावर ते म्हणत, कलाकारांनी गायलेली संपूर्ण बंदिश, राग, स्वर साक्षात माझ्यासमोर उभी रहाते. मी केवळ तिला गात नसे तर डोळे भरून पाहतही असे. वयाच्या नवव्या वर्षी कुमार यांची दुर्गा आणि भैरवी रागातील रेकॉर्ड प्रसिद्ध झाली. गाणे आवडणाऱ्या कुमारच्या वडिलांनी त्यांना शाळेत घातले ते शाळेत जाऊही लागले पण सारे लक्ष त्यांचे घरातल्या ग्रामोफोनवर असे. मग वयाच्या बाराव्या वर्षी प्रो. देवधर यांच्याकडे ते गुरु गृही राहून संगीत शिक्षण घेऊ लागले. पुढे सर्वदूर मैफिली होत होत्या. पण मधे आजारपण आलं. त्या काळात पत्नी भानुमती यांनी सेवा केली. कालांतराने बाळंतपणात त्याही सोडून गेल्या. मग देवधर बुवांच्या शिष्या असलेल्या वसुंधराबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ते देवासलाच रहात असत.
माळव्याची लोकगीतं, निर्गुणी भजन, नवरागनिर्मिती यावर कुमारजींचा मोठा व्यासंग होता. कुमारजींची लोकप्रियता अफाट होती. संगीतातील जाणकार मंडळी त्यांच्या गायकीवर जीव ओवाळून टाकायची. त्यामध्ये महाराष्ट्रीय मंडळींची संख्या मोठी होती. पुणे आणि मुंबईच्या उपनगरातील रसिकांच्या हृदयावर कुमारजींनी अधिराज्य गाजवले. याचठिकाणी त्यांच्या गाण्याच्या मैफली रंगायच्या. चेंबूरसारख्या परिसरात शाळांमध्ये त्यांच्या मैफली व्हायच्या. अगदी फुकट. खरेखुरे संगीताचे दर्दी या मैफलींना हजेरी लावायचे आणि कुमारजींच्या गाण्याची हरएक तान कानात जपून ठेवायचे.
लोकसंगीत आणि लोकधुना यातून कुमार गंधर्व यांना जे संगीताचे दर्शन झाले त्यातून त्यांनी ११ नवे राग रसिकांना सादर केले.कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली. माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ इ. कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले. १९६५ साली अनुपरागविलास हा नव्या- जुन्या रागांत स्वत: बांधलेल्या बंदिशींचा संग्रह प्रसिद्ध केला. सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांच्या गायनाचे कार्यक्रम व खास माळवी लोकगीतांच्या मैफली त्यांनी केल्या. त्यांनी संगीतात जे विविध प्रयोग केले त्यातील एक म्हणजे मला उमगलेले बालगंधर्व. त्यांना बालगंधर्वांच्या गाण्या विषयी अतूट प्रेम होते.
कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बारना विचारले , कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले , पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले. भारत सरकारने १९९० साली कुमारजींना पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. अशा कुमार गंधर्व यांचा स्वर, चिरतरुण सदाबहार व भुरळ घालणारा आहे.