स्मार्ट हेल्मेट कॅमेराद्वारे १८० डिग्री मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे छायाचित्र टिपत थर्मल स्क्रीनिंग करते. त्यातून शरिराचे तापमान समजते व थर्मल इमेज हेल्मेट तंत्रज्ञाला दिसते. क्यूआर कोड आणि मोबाईल अँप्लिकेशनला सुद्धा जोडण्याची सुविधा यात आहे. नाशिक मधील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता भारतीय जैन संघटनेने स्मार्ट हेल्मेट उपलब्ध करून दिले आहे.
नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांचे पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या “मिशन झिरो नाशिक” या एकात्मिक कृती योजनेच्या ४२ व्या दिवशी फक्त मार्केट यार्ड पंचवटी या ठिकाणीच स्मार्ट हेल्मेट द्वारे स्क्रीनिंग करण्यात आले. आता पुढील दिवसात शहरातील सर्व भाजी बाजार व गर्दीच्या बाजार पेठा या ठिकाणी स्मार्ट हेल्मेट द्वारे मास थर्मल स्क्रीनिंग केले जाणार आहे.