नवी दिल्ली : एके काळी कोरियन कंपनी एल जी इलेक्ट्रॉनिक्सच्या स्मार्टफोनचा सगळीकडे बोलबाला होता. या कंपनीने स्मार्ट फोनमध्ये अनेक बदलही केले. पण, जसजशी या क्षेत्रात स्पर्धा वाढत गेली, एलजी या स्पर्धेत टिकून राहू शकली नाही. परिणामी, स्मार्टफोनच्या क्षेत्रातून आपण बाहेर पडत असल्याचे एलजी ने सोमवारी जाहीर केले. स्मार्टफोनचा हा पहिलाच ब्रँड आहे, जो या क्षेत्रातून संपूर्णपणे बाहेर पडतो आहे
स्मार्ट फोनच्या बाबतीत बोलायचे तर एलजी कंपनीला ६ वर्षांपासून तोटा सहन करावा लागतो आहे. या काळात कंपनीला एकूण साडे चार बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोन्ही आघाड्यांवरही चिनी कंपन्यांनी एलजीला मागे टाकले आहे. यामुळेच कंपनीने या क्षेत्रातून पूर्णपणे अंग काढून घ्यायचे ठरवले आहे. सध्याच्या घडीला एलजीचा मार्केटमधील शेअर केवळ २ टक्के आहे.
गेल्यावर्षी कंपनीने २३ मिलियन फोनची विक्री केली. तर सॅमसंगने जवळपास २५६ मिलियन फोनची शिपमेंट केली आहे. एलजी स्मार्टफोन विभागाचा महसूल कंपनीच्या इतर विभागांच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे ७ टक्क्यांच्या आसपास आहे. या परिस्थितीमुळेच एलजीने स्मार्टफोन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या विभागातील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात सामावून घेतले जाणार असून आता कंपनी इलेक्ट्रिक व्हेईकलच्या क्षेत्रात उतरणार असल्याची चिन्हे आहेत. २०१३ मध्ये सॅमसंग आणि ऍप्पलनंतर एलजी हा जगातील तिसरा मोठा स्मार्टफोन ब्रँड होता. या कंपनीने स्मार्टफोनमध्ये अनेक बदल, सुधारणा केल्या. याच कंपनीने सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये वाईड अँगल कॅमेरा दिला होता. असे असले तरीही आज एलजीने हा स्मार्टफोन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.