मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घरापुढे स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास एजन्सीने (एनआयए) दावा केला आहे की या प्रकरणात अनेक दिग्गज लोक सामील आहेत. या मोठ्या नावांच्या इशाऱ्यावरच सचिन वाझे काम करीत होते, असाही दावा करण्यात आला आहे.
वाझेला अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली आहे. त्यात स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओजवळ पीपीई घातलेला एक माणूस दिसत आहे, तो वाझेच असल्याचे पुढे आले आहे. तपास यंत्रणेची दिशाभूल करण्यासाठी पीपीई कीटच्या आत कुर्ता पायजामा घातलेला होता. डोक्यावर रुमालही बांधलेला होता.
एनआयएच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की या प्रकरणात अनेक मोठी नावे सहभागी असल्याचे पुरावे हाती लागले आहेत. सचिन वाझे केवळ एक मोहरा आहे. तो केवळ या मोठ्या नावांच्या इशाऱ्यावर काम करीत होता. यातील काहींना लवकरच चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.
तो वाझेच होता
एनआयएने सांगितले की घटनेच्या दिवशी वाझेच आपली सरकारी गाडी इनोव्हा घेऊन स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ मुकेश अंबानीच्या घरापुढे उभी करण्यासाठी गेला होता. एनआयएने इनोव्हादेखील ताब्यात घेतली आहे. तसेत वाझेकडे असलेली एक मर्सिडिझदेखील ताब्यात घेण्यात आली आहे. आणखी एक मर्सिडीझ आणि स्कोडाचा शोध सुरू आहे.